लेखापरीक्षण विभागाला टाळे ?
By admin | Published: April 23, 2015 05:35 AM2015-04-23T05:35:50+5:302015-04-23T05:35:50+5:30
स्थायी समितीच्या आखत्यारीत असलेल्या मुख्य लेखापरीक्षण विभागाला टाळे लावण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे़ या खात्यातील कर्मचारी वर्गात कपात करण्यात येत आहे़
मुंबई : स्थायी समितीच्या आखत्यारीत असलेल्या मुख्य लेखापरीक्षण विभागाला टाळे लावण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे़ या खात्यातील कर्मचारी वर्गात कपात करण्यात येत आहे़ हा प्रकार म्हणजे प्रशासनाचा स्थायी समितीच्या अधिकारावर गदा असल्याचे तीव्र पडसाद आज उमटले़
याची गंभीर दखल घेऊन अन्य विभागांमध्ये पाठविण्यात आलेले लेखापरीक्षण खात्याच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ माघारी बोलावण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले़ तसेच प्रशासनाच्या मनमानीविरोधात स्थायी समितीची बैठक एकमताने तहकूब करण्यात आली़ मुख्य लेखापरीक्षण हा विभाग १९३८ पासून कार्यरत आहे़ प्रशासकीय कामकाजाचे प्रत्येक महिन्यात परीक्षण करून स्थायी समितीपुढे अहवाल सादर करण्याचे या विभागाचे काम आहे़ परंतु गेल्या सात वर्षांमध्ये या विभागाकडून लेखापरीक्षण अहवाल सादर झालेला नाही़ हजार कर्मचारी-अधिकारी वर्ग असलेल्या या विभागातील शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान खात्यात पाठविण्यात आले आहे़ तसेच
या विभागातील मनुष्यबळ कमी
करीत हा विभाग बंद करण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली असल्याचे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीच्या निदर्शनास आणले़
याबाबत नगर विकास खात्याला पत्र लिहून हा विभाग बंद करायचा असल्याने कर्मचारी वर्गाचे काय
करावे, असे पत्रच आयुक्त सीताराम कुंटे यांनी नगर विकास खात्याला पाठविले आहे़ हे पत्र म्हणजे स्थायी समितीच्या अधिकारावर गदाच असल्याचा संताप सदस्यांनी व्यक्त केला़
आयएएस लॉबी लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा आणत असल्याने त्यांना दणका द्यायलाच हवा, असे मत सर्वांनी व्यक्त केले़ स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हे पत्रच बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त करीत सभा तहकूब केली़ (प्रतिनिधी)