कोकण रेल्वे बोर्ड बरखास्त करा

By Admin | Published: March 12, 2015 11:09 PM2015-03-12T23:09:25+5:302015-03-12T23:50:28+5:30

विनायक राऊत : लोकसभेत सभापतींसमोर केली मागणी

Disconnect Konkan Railway Board | कोकण रेल्वे बोर्ड बरखास्त करा

कोकण रेल्वे बोर्ड बरखास्त करा

googlenewsNext

कुडाळ : प्रवाशांना योग्य पद्धतीने सेवा व सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता कोकण रेल्वे बोर्ड बरखास्त करून हे बोर्ड भारतीय रेल्वेत समाविष्ट करावे व येथील वाढणाऱ्या रेल्वे गाड्या व प्रवाशांची वाढ लक्षात घेता येथील रेल्वेमार्ग डबलट्रॅकचा करावा, अशी मागणी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत सभापतींसमोर केल्याची माहिती गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.यंदाच्या या रेल्वे बजेटसंदर्भात लोकसभेत खासदार राऊत म्हणाले की, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी रेल्वे बजेटातून भारतीय रेल्वेत सुधारणा होण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत हे चांगले आहे. मात्र, भारतात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या समस्या निराकरणासाठी या बजेटमध्ये कोणतेच स्थान नाही.
या कोकण रेल्वे मार्गावरून प्रत्येक दिवसाला ३० ते ३५ रेल्वे गाड्या चालतात. या रेल्वेने भारतातील विविध प्रदेशातील नागरिकांबरोबरच विदेशी पर्यटकही मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. एवढे सारे असूनही येथील कोकण रेल्वे सर्व प्रवाशांना सेवा सुविधा योग्यप्रकारे देऊ शकत नाही. याच्या अनेक कारणांपैकी एक असलेला रेल्वेमार्ग हा सिंगल ट्रॅकचा आहे हे महत्त्वाचे कारण आहे. डबल ट्रॅक नसल्याने येथील रेल्वेंना मोठ्या प्रमाणात क्रॉसिंगला सामोरे जावे लागते. त्यामुळे १२ ते १५ तास प्रवास वाढतो. त्यामुळे या ट्रॅकवर डबल ट्रॅक होण्याची गरज आहे.रेल्वेमार्गाचे आयुर्मान संपले यावेळी राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, सहा महिन्यांपूर्वी येथील रेल्वेमार्गाची तपासणी सुरक्षा कमिशनने केली होती. त्यांनी या ट्रॅकवरून ताशी ७० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने रेल्वेगाडी चालविणे शक्य नाही असा अहवाल दिला असून आयुर्मान संपत आलेल्या या ट्रॅकवरून मोठ्या प्रमाणात रेल्वे सेवा व मालगाडी रेल्वेसेवाही दिली जात आहे. मात्र, रेल्वेमार्गाच्या काळजी घेण्याविषयी कोकण रेल्वे प्रशासन पावले उचलत नाहीत.आयुर्मान संपलेल्या या ट्रॅककडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गेल्याच वर्षी या मार्गावर पाच मोठे अपघात घडले. पाच रेल्वे पटरीवरून उतरून मोठे अपघात घडले, तर कणकवली येथे रेल्वे रुळानजीक चालत्या रेल्वेवर जेसीबी कोसळला होता. याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे.कोकण रेल्वे मार्गावरील कोकणातील चिपळूण येथील असुरडे, राजापूर येथील सौंदळ या गावात रेल्वे स्थानक मंजूर आहे. मात्र, निधीअभावी ती रखडली. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गातील बोर्डवे येथील लोकांचीही रेल्वे स्थानकाची मागणी आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोवा या प्रदेशात आवश्यक त्या ठिकाणी रेल्वेस्थानक बनवावीत, अशीही मागणी केली.
यावेळी या कोकण रेल्वेविषयी प्रश्न, समस्या खासदार राऊत यांनी लोकसभा सभापतींसमोर कथन केल्या व रेल्वेच्या समस्या सुटण्याकरिता लक्ष वेधले. (प्रतिनिधी)

डबलट्रॅक व्हावा
१८ वर्षांपूर्वी माजी रेल्वेमंत्री व जिल्ह्याचे सुपुत्र मधु दंडवते यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या कोकणातून कोकण रेल्वे धावली असून सुदैवाने याच कोकणाचे सुपुत्र सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्री असून त्यांनी तरी अठरा वर्षांनंतर या रेल्वेमार्गाचे डबलट्रॅकमध्ये रूपांतर करावे, अशी आमची अपेक्षा आहे.
हाऊसिंग प्रकल्प अधिकाऱ्यांना प्रिय
कोकण रेल्वे बोर्डवर भारतीय रेल्वे प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा अंकुश नसून कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी कोकण रेल्वेच्या दुरुस्ती मोहिमेपेक्षा हाऊसिंग प्रकल्पाकडे अधिक लक्ष घालताना दिसतात. त्यामुळे आपल्या स्तरावरून तरी कोकण रेल्वेच्या सीएमडी यांना सूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी खासदार राऊत यांनी केली.

Web Title: Disconnect Konkan Railway Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.