नागो गाणारांच्या उमेदवारीविरोधात असंतोष
By admin | Published: September 2, 2016 01:47 AM2016-09-02T01:47:53+5:302016-09-02T01:48:16+5:30
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जवळ आल्या असून यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार नागो गाणार यांना परत उमेदवारी देण्यात
नागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जवळ आल्या असून यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. विद्यमान आमदार नागो गाणार यांना परत उमेदवारी देण्यात आल्याच्या मुद्यावरून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेत असंतोष निर्माण झाला आहे. नागपूर विभागीय अध्यक्षांसमवेत कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी राजीनामे दिले आहे. शनिवारी पुण्यात होणाऱ्या परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत गाणारांना उमेदवारी दिल्याच्या निर्णयाविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात येणार आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार हा प्रस्ताव फेटाळण्यात आला तरी, असंतुष्ट सदस्यांकडून नवा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी शेषराव बीजवार यांचे नाव चर्चेत आहे. चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक विद्यालयात रविवारी झालेल्या बैठकीत नागपूर विभागीय सदस्यांनी याचे संकेत दिले होते. या बैठकीत सर्वांनी राजीनामे दिले. गाणार यांची कार्यकर्त्यांसोबतची वागणूक, अपशब्दांचा वापर व निष्ठावान कार्यकर्त्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे सदस्यांमध्ये त्यांच्याविरोधात असंतोष आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाणार यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. सोबतच त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय नियमबाह्य व संघटनेच्या घटनेच्या विरोधात असल्याचा दावा केला आहे.
नागो गाणार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय मे महिन्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीत घेण्यात आला होता. राज्य कार्यकारिणीला हा निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाददेखील केला होता. कार्यकारिणीचा कार्यकाळ जानेवारी २०१५मध्ये संपुष्टात आला होता. नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी तत्काळ निवडणुका व्हायला हव्या होत्या. परंतु असे न करता कार्यकारिणीने निवडणुका सहा महिन्यांसाठी स्थगित केल्या. गाणार यांची उमेदवारी कायम राहावी, हा यामागचा उद्देश होता. (प्रतिनिधी)