सामान्यकरात मिळणार सवलत

By admin | Published: June 5, 2017 12:43 AM2017-06-05T00:43:31+5:302017-06-05T00:43:31+5:30

सामान्यकरात ५ ते ५० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी मालमत्ताधारकांना ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरावा लागणार आहे.

The discount in the general category will be available | सामान्यकरात मिळणार सवलत

सामान्यकरात मिळणार सवलत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका मालमत्ता करांतर्गत आकारण्यात येणाऱ्या सामान्यकरात ५ ते ५० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी मालमत्ताधारकांना ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरावा लागणार आहे. या करसवलतीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.
आगाऊ कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात येते. तर बिगरनिवासी, औद्योगिक, मोकळ्या जमिनी अशा मालमत्तांना पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे आगाऊ कर भरणा करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. याशिवाय महापालिकेने आॅनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात प्रत्येक वर्षी वाढ होत आहे.
महापालिकेतर्फे सामान्य करासाठी विविध सवलत योजना लागू आहेत. महिलांच्या नावे असलेले निवासी घर, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक किंवा त्याची पत्नी यांच्या निवासी घराला, तसेच ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावरील मिळकतींना चालू आर्थिक वर्षाच्या मागणीतील सामान्य कराच्या रकमेत ५० टक्के सवलत देण्यात येते.
याशिवाय ग्रीन बिल्डिंग रेटिंग पद्धतीतील मालमत्तांना ५ ते १५ टक्क्यांपर्यंत सवलत मिळते. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांना ३० जूनपर्यंत मालमत्ताकर भरावा लागणार आहे. नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरात १६ करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. तसेच, सहा क्षेत्रीय कार्यालये आहेत. या ठिकाणी कर भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, १६ करसंकलन कार्यालयांमध्ये साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सकाळी ९ ते दुपारी साडेतीन या वेळेत कर भरता येणार असल्याचे दिलीप गावडे यांनी सांगितले.
>सव्वा तेरा कोटींची वाढ
चालू आर्थिक वर्षात गेल्या दोन महिन्यांत ३१ मेपर्यंत ७७ हजार ६११ मालमत्ताधारकांनी ७१ कोटी ५२ लाख रुपये मालमत्ताकराचा भरणा केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यात १३ कोटी २६ लाख रुपयांची वाढ झाली आहे. त्यापैकी ३२ हजार ६७२ मालमत्ताधारकांनी करसवलत योजनेचा लाभ घेतला. त्यांना २ कोटी ८१ लाख रुपयांची सवलत देण्यात आल्याचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी नमूद केले.

Web Title: The discount in the general category will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.