‘विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस’मध्ये सवलती नाकारल्या
By admin | Published: July 13, 2015 01:44 AM2015-07-13T01:44:02+5:302015-07-13T01:44:02+5:30
वारक-यांची रेल्वेकडून उपेक्षा.
गिरीश राऊत, खामगाव (जि. बुलडाणा): आषाढी एकादशीनिमित्त खामगाव ते पंढरपूर या विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसला गेल्या १0 वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही यावर्षी रेल्वेने वारकर्यांना तिकीट दरातील सवलत नाकारली. त्यामुळे वारकर्यांमध्ये नाराजी आहे.
गेल्या दहा वर्षांपासून पंढरपूरकरीता खामगाव व अमरावती स्थानकावरून विठ्ठल दर्शन एक्स्प्रेस ही विशेष रेल्वे सोडण्यात येते. एकाच दिवशी निघणार्या या गाड्यांची जलंब येथे एक गाडी होऊन दुसर्या दिवशी सकाळी पंढरपुरला ती पोहचते. दरवर्षी हजारो वारकरी रेल्वेच्या माध्यमातून पंढरपुरला जातात. यापासून रेल्वेला दरवर्षी लाखो रुपयांचे मिळते. या गाडीत रेल्वेकडून ज्येष्ठांना, तसेच १८ वर्षांआतील मुलांना तिकिट दरात ५0 टक्के सूट दिली जात होती. मात्र यावर्षी या एक्स्प्रेसमध्ये सर्व सवलती नाकारण्यात आल्या आहेत.
यावर्षी पहिली विठ्ठल दर्शन एक्स्प्रेसची फेरी २१ जुलै रोजी सुटणार आहे. यानंतर २२, २४ व २५ रोजीही फेर्या जातील. परतीच्या प्रवासात २२, २३, २८ व २९ जुलै या तारखांना ही गाडी पंढरपूर स्थानकातून निघणार आहे.
*असे असतील प्रवासाचे दर
वातानुकूलित ३ टियरसाठी जलंब ते पंढरपूर प्रवासभाडे १२५५ रुपये तसेच शयनयानसाठी ४६५ रुपये, तर द्वितीय श्रेणीसाठी २२५ रुपये प्रवासभाडे असणार आहे.