बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध, स्पेरोथिका पश्चिमा असे नामकरण
By Admin | Published: June 27, 2017 05:32 PM2017-06-27T17:32:19+5:302017-06-27T17:32:19+5:30
पुण्याच्या पूर्वेला सासवड परिसरात असलेल्या माळरानांमधून बेडकाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.
ऑनलाइन लोकमत/निलेश काण्णव
भीमाशंकर, दि. 27 - पुण्याच्या पूर्वेला सासवड परिसरात असलेल्या माळरानांमधून बेडकाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. पुणे येथील इन्स्टिट्युट आॅफ नॅचरल हिस्टरी एज्युकेशन अँड रिसर्च (इनहर) ही संस्था आणि पुणे वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन वर्ष संशोधन सुरू होते. भारताच्या पश्चिम भागात ही प्रजाती आढळत असल्याने या प्रजातीचे स्पेरोथिका पश्चिमा असे नामकरण करण्यात आले आहे.
प्रचलित स्पेरोथिका ब्रेव्हिसेप्स या प्रजातीशी साधर्म्य दाखविणारी ही प्रजाती जैविक गुणसूत्रे तसेच शारीरिक वैशिष्ट्ये यांच्या अभ्यासाच्या आधारे ब्रेव्हिसेप्सपेक्षा वेगळी असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या संदर्भातील शोधनिबंध जर्नल आॅफ थ्रेटंड टॅक्सा या वैज्ञानिक नियतकालिका च्या जुलै महिन्याच्या खंडात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ.आनंद पाध्ये, आयसर (पुणे) येथील संशोधक डॉ. निलेश डहाणूकर, इनहर संस्थेचे संशोधक शौरी सुलाखे, निखिल दांडेकर तसेच पुणे वन्यजीव विभागाचे तत्कालीन मुख्य वन्यजीव संरक्षक सुनील लिमये, सहायक वनसंरक्षक किर्ती जमदाडे-कोकाटे यांच्या एकत्रित सहभागाने ही मोहीम पार पडली. वन्यजीव संशोधन म्हणजे फक्त शास्त्रज्ञ व त्यांचे सहकारी यांचेच काम असते, अशा प्रचलित सर्वसामान्य समजुतीला फाटा देत पुणे वन्यजीव विभागाने पुढाकार घेऊन पुण्याच्या पूर्वेला असलेल्या मयुरेश्वर, सुपे, रेहेकुरी आणि करमाळा तसेच भीमाशंकर या अभयारण्यात संशोधनात मोलाचा वाटा उचलला आहे. या संशोधनातून कमी आकर्षक असलेल्या परंतु नैसर्गिक परिसंस्थेत मोलाचे स्थान असलेल्या या जिवांच्या विविधतेवरती प्रकाश पडला आहे. भीमाशंकर अभयारण्यात असलेल्या गवताच्या वेगवेगळ्या प्रजाती शोधून त्यांचे परिसंस्थेतील जिवांवर असलेले अवलंबून यावर अभ्यास सुरू आहे.
याबाबतत कीर्ती जमदाडे-कोकाटे यांच्याशी चर्चा केली असता, वन्यजीव विभागाने इनहरला दिलेल्या दिलेल्या प्रोत्साहनामुळे वन्यजीव विश्वातील हे रहस्य उलगडले आहे. या शोधामुळे वनविभागाच्या प्रदेशांमधे अजून किती संशोधन होणे गरजेचे आहे. हे अधोरेखित झाले आहे. भविष्यात अजून अनेक रहस्ये शोधण्यासाठी वन्यजीव विभाग अशा मोहिमांमध्ये सहभागी होईल. संशोधनानंतर या प्रजातीला स्पेरोथिका पश्चिमा हे भारतीय नाव देण्यात यश आले याचा विशेष आनंद वाटतो.