जलसंपदामंत्री व सुरेशदादा यांच्यात १ तास २३ मिनिटे बंद खोलीत चर्चा
By admin | Published: September 4, 2016 09:12 PM2016-09-04T21:12:01+5:302016-09-04T21:12:01+5:30
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 4 - घरकूल प्रकरणात साडेचार वर्षांनंतर जामीन मिळालेल्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शिवाजीनगर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तब्बल १ तास २३ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर नितीन लढ्ढा, राजेश जैन हे देखील उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगत महाजन यांनी या विषयावर पत्रकारांना माहिती देणे टाळले.
केवळ सदिच्छा भेट, राजकीय चर्चा नाही गिरीश महाजन यांनी सांगितले की, सुरेशदादांचे व त्यांचे १९९५ पासून वैयक्तीक संबंध आहेत. दादांनी वेळोवेळी मदतही केली असल्याचे सांगत महाजन म्हणाले की, कालच दादांना जामीन मिळाला. त्यामुळे त्यांना भेटायचे होेते. ही केवळ सदिच्छा भेट होती. त्यात राजकीय चर्चा झाली नाही. दादांची मुंबईत रूग्णालयात भेट घेतली होती. त्यानंतर दीड वर्षांपासून भेट झालेली नव्हती. साडेचार वर्ष खूप मोठा काळ असून दादांना व त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला. आता न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्यांच्या भेटीसाठी आलो. राजकीय चर्चेसारखी परिस्थिती नाही. तसेच सुरेशदादांचा राजकीय अनुभव ४० वर्षांचा आहे. त्यांच्याशी राजकीय विषयावर मी काय चर्चा करणार? असा सवालही त्यांनी केला. भेटायला येण्याने कुणी दुखावेल, असे वाटत नाही महाजन यांनी सुरेशदादांची भेट घेतल्याने भाजपातील एक गट नाराज होणार नाही का? अशी विचारणा केली असता महाजन म्हणाले की, निवडणुका लढणे इतरपर्यंत ठीक आहे. मात्र सर्वच पक्षात मित्र आहेत. हा शत्रू आहे, याच्याकडे जायचे नाही, असे मी मानत नाही. दादांशी तर १९९५ पासूनचे संबंध आहेत. तसेच आमच्या मित्रपक्षाचे ते माजी आमदार आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला येण्याने कुणी दुखावेल, असे वाटत नाही, असे सांगितले.
४ वाजून ७ मिनिटांनी झाले आगमन धरणगाव येथील कार्यक्रम आटोपून जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे ४ वाजून ७ मिनिटांनी ७, शिवाजीनगर या सुरेशदादांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे महापौर नितीन लढ्ढा हे आधीच दाखल झाले होते. सुरेशदादांना भेटणाऱ्यांची हॉलमध्ये गर्दी असल्याने त्यालगतच्या रूममध्ये हे जाऊन बसले.
सुरेशदादा हे सुपुत्र राजेश जैन व पुतण्या आशेष जैन सोबत होते. त्यांच्यात बंदद्वार चर्चेला सुरुवात झाली. ४ वाजून ३५ मिनिटांनी गुलाबराव पाटील हे इलेक्ट्रॉनिक माध्यमांना अन्य एका विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी काही वेळ बाहेर आले. त्यानंतर ते पुन्हा त्या खोलीत जाऊन चर्चेत सहभागी झाले. त्यानंतर ५ वाजून १५ मिनिटांनी गुलाबराव पाटील, नितीन लढ्ढा व अन्य बाहेर आले. खोलीत केवळ सुरेशदादा, गिरीश महाजन व राजेश जैन यांच्यात आणखी १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली.