मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली; संजय राऊतांची माहिती, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 12:23 PM2023-07-07T12:23:05+5:302023-07-07T12:23:59+5:30
आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची, कोणत्याही नाटकाची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या विविध शहरांमध्ये ठाकरे बंधुंनी एकत्रित यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र यावेत असे बॅनर्स झळकले आहेत. त्यानंतर गुरुवारी मनसे नेते अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांची भेट झाली. या भेटीनंतर राऊत मातोश्रीवर गेले तर पानसे शिवतीर्थावर पोहचले. त्यामुळे मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांना उधाण आले.
आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्यासोबत बोलायला मध्यस्थींची गरज नाही. माझी आणि राज ठाकरे यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. भले आमचे रस्ते वेगळे झाले असले तरी आमची इमोशनल अटॅचमेंट आजही आहे. या संदर्भात माझं बोलणं झालं आहे. चर्चा घडवण्यासाठी या नोटंकी केल्या जातात. आम्ही कोणालाही आमंत्रण दिलं नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भाऊ आहेत सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे संजय राऊत यांची मैत्री ही सगळ्यांना माहित आहे. ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याबद्दल सविस्तर उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. त्यात उद्धव ठाकरे काय म्हणाले हे मी सांगू शकत नाही. हा आमच्या पक्षांतर्गत विषय आहे असं राऊतांनी म्हटलं.
त्याचसोबत राज ठाकरे आणि आमचे रस्ते वेगळे झाले आहेत. मी आमच्या पक्षाची भूमिका मांडत आहे त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने काम करतो. आम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थांची, कोणत्याही नाटकाची गरज नाही. उद्धव आणि राज ठाकरे हे भाऊ आहे. एक कुटुंब आहे. एक फोन उचलायचा आणि एकमेकांशी बोलायचं कोणी येऊन नोटंकी करण्याची गरज नाही. या ज्या चर्चा झाल्या या संदर्भात आम्ही सविस्तर बोललो असं संजय राऊतांनी सांगितले.
शिंदेंचे १७-१८ आमदार संपर्कात
शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात आहेत. शिंदे गटातील ४ जणांनी आज ही माझ्यासोबत संपर्क केला. हे आमदार त्यांच्या व्यथा आमच्याकडे मांडत आहेत. आम्ही ऐकण्याचे काम करतो. ते आमचे जुने सहकारी आहेत. आम्ही त्यांच्यासोबत काम केलंय. मागील ८ दिवसांपासून संपर्क सुरू आहे. त्यांना पक्षात घ्यायचे की नाही तो निर्णय पक्षप्रमुखांचा आहे पण ते संपर्कात आहेत असं संजय राऊतांनी सांगितले.