'ब्ल्यू व्हेल' खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन कारवाई - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:33 PM2017-08-01T13:33:23+5:302017-08-01T13:39:15+5:30
'मुंबईतील घटनेची चौकशी करुन आणि हा खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन कारवाई केली जाईल', असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे
मुंबई, दि. 1 - अंधेरी येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्यानंतर 'ब्ल्यू व्हेल' गेमचा मुद्दा चर्चेला आला आहे. या मुलाने शनिवारी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी विधानसभेत निवेदन दिलं असून 'मुंबईतील घटनेची चौकशी करुन आणि हा खेळ कसा थांबवता येईल, यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करुन कारवाई केली जाईल', असं आश्वासन दिलं आहे.
ब्ल्यू व्हेल गेमच्या वेडापायी, अंधेरीतील शेर-ए-पंजाब कॉलनीमध्ये राहणा-या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. रशिया आणि अन्य देशांमध्येही काही जणांना या गेमच्या नादात आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र भारतामध्ये या गेमचं असलेलं वेड पहिल्यांदाच समोर आलं आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणादेखील सतर्क झाली असून तपास सुरु केला आहे.
दरम्यान विधानसभेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित करत हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचं सांगितलं. 'सरकारने पुढाकार घेऊन, वेळ पडली तर केंद्र सरकारशी संपर्क साधण्याची गरज आहे. आपलं वजन वापरुन देशपातळीवरच ब्ल्यू व्हेल गेम पूर्णपणे बंद करणं आवश्यक आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे', असं अजित पवार बोलले आहेत.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, 'हा गंभीर विषय आहे, त्याची चौकशी सुरु आहे. या संदर्भातील आवश्यक सगळी माहिती घेतली जाईल. हा इंटरनेट बेस गेम असल्याने, त्याचं सर्व्हर आपण होस्ट करत नाही, तो बाहेरुन आहे. त्यामुळे तो कसा थांबवता येईल, याबाबत केंद्र सरकारशी बोलून कारवाई केली जाईल'.
काय आहे ब्ल्यू व्हेल गेम -
‘ब्ल्यू व्हेल’ या गेममध्ये मुला-मुलींना सोशल मीडियावरून संपर्क करण्यात येतो. त्यांना ५० दिवसांमध्ये काही कामे करण्यास सांगण्यात येतात. यामध्ये कुटुंब व मित्रांशी संपूर्ण संबंध तोडणे, स्वत:ला इजा करून घेणे यांचा समावेश आहे. याचे चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवावे लागते, जेणेकरून दिलेले आव्हान पूर्ण होण्याची खात्री होते. अखेर पर्यवेक्षक सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान देतो. गेम डाउनलोड केला की, तो डिलिट होत नाही. वापरकर्त्याची वैयक्तिक माहितीदेखील हॅक होण्याची शक्यता असते.
पालकांनो हे कराच...-
मुले कोणता गेम खेळतात, याकडे लक्ष द्या.
त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या.
मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा.
मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा.
चांगले आणि वाईट काय, हे त्यांच्या वयाचे होऊन समजेल अशा भाषेत सांगा.
गेम टास्क-
हातावर ब्लेडने ब्ल्यू व्हेलचे चित्र रेखाटणे
हाताच्या नसा कापणे
ओठांवर ब्लेडने कापणे
पहाटे एखाद्या उंच ठिकाणी जाणे
पहाटे उठून हातावर वार करणे
हॉरर चित्रपट पाहणे
गच्चीवरून उडी मारणे