कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ, बोनसचे दिवस, किती व कधी मिळणार याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 06:52 AM2017-09-22T06:52:57+5:302017-09-22T06:53:00+5:30
केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात महागाई भत्त्यामध्ये एक टक्क्याने वाढ केल्यानंतर राज्य सरकारने आपल्या सरकारी इतर पात्र कर्मचा-यांंचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : केंद्र सरकारने गेल्याच आठवड्यात महागाई भत्त्यामध्ये एक टक्क्याने वाढ केल्यानंतर राज्य सरकारने आपल्या सरकारी इतर पात्र कर्मचा-यांंचा महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढीव भत्त्याची रक्कम १ आॅगस्ट २०१७ पासून रोखीने देण्याचा आदेश आज वित्त विभागाने काढला आहे.
१ जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश काढले जातील, असे सांगण्यात आले आहे. ही रक्कम रोखीने कधी दिली जाणार, हे निश्चित नसले तरी ती दिवाळीपूर्वी कर्मचाºयांना मिळण्याची शक्यता आहे.
महागाई भत्त्याची रक्कम देण्यासाठी विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे तशीच यापुढेही चालू राहील. तसेच हे आदेश सुधारित वेतनश्रेणीमध्ये व अशा वेतनास लागू असलेल्या संस्थांमधील कर्मचा-यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.
याखेरीज सरकारी कर्मचा-यांना दिवाळीच्या काळात त्याआधी फेस्टिव्हल अॅडव्हान्स दिला जातो. ती रक्कम ठरावीक कर्मचा-यांनाच मिळते आणि नंतर १२ महिन्यांमध्ये ती कापून घेण्यात येते. यंदा ती रक्कम व महागाई भत्त्याची रक्कम एकत्र मिळावी, अशी कर्मचा-यांची इच्छा आहे.
>सर्वत्र चर्चा बोनसची
दसरा जवळ येताना वा तो होऊ न गेल्यानंतर लगेचच खासगी उद्योग व कार्यालयांतील कर्मचा-यांच्या बोनसची तयारी सुरू होते. नवरात्र सुरू झाल्यामुळे कर्मचाºयांमध्ये यंदा बोनस कधी व किती मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या मंदी असल्याने यंदा बोनस मिळणार का, ही शंकाही अनेक जण व्यक्त करीत आहेत. बोनसची घोषणा खासगी कंपन्यांनी आतापर्यंत केलेली नाही. ती कधी होणार, याची कर्मचारी वाट पाहत आहेत.