परीक्षेपूर्वीच उत्तरे व्हायरल? बारावी गणिताच्या सेक्शन ‘ए’चे प्रश्न फुटल्याची चर्चा : बाेर्डाचा स्पष्ट नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 05:58 IST2025-02-23T05:58:17+5:302025-02-23T05:58:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शनिवारचा बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेच्या काही वेळापूर्वी माेबाइलवर व्हायरल झाल्याच्या चर्चेने पुन्हा यंत्रणेच्या दक्षतेवर ...

परीक्षेपूर्वीच उत्तरे व्हायरल? बारावी गणिताच्या सेक्शन ‘ए’चे प्रश्न फुटल्याची चर्चा : बाेर्डाचा स्पष्ट नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारचा बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेच्या काही वेळापूर्वी माेबाइलवर व्हायरल झाल्याच्या चर्चेने पुन्हा यंत्रणेच्या दक्षतेवर प्रश्न निर्माण केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिकेतील सेक्शन ‘ए’चे प्रश्न पेपर सुरू हाेण्यापूर्वी व्हायरल झाले. त्यामुळे शहरातील बऱ्याच केंद्रांबाहेर यावरून संशयास्पद हालचाली झाल्याची चर्चा आहे. मात्र, विभागीय मंडळाने अशाप्रकारे प्रश्नपत्रिका व्हायरल हाेण्याच्या माहितीबाबत स्पष्ट नकार दिला आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजतापासून पेपर सुरू हाेणार हाेता. नागपूर शहरातील काही केंद्रांवर सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गणिताची प्रश्नपत्रिका माेबाइलवर मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ही प्रश्नपत्रिका ग्रामीण भागातील एखाद्या केंद्रावरून व्हायरल झाली असल्याचे बाेलले जात आहे. सेक्शन ‘ए’च्या आठ प्रश्नांसाठी १६ गुण आहेत. हाच भाग व्हायरल करण्यात आल्याचे बाेलले जात आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या उत्तरांचे पर्याय असलेला कागदही माेबाइलवर फिरत हाेता. पण, तोपर्यंत विद्यार्थी परीक्षेसाठी आत गेले होते. पेपर फुटल्याची शक्यता बाेर्डाच्या अधिकाऱ्यांनी धुडकावून लावली.
यवतमाळ : मुख्य आरोपीला अटक
महागाव (जि. यवतमाळ) : तालुक्यातील कोठारी येथील आदर्श विद्यालय परीक्षा केंद्रावरून दहावीचा मराठीचा पेपर शुक्रवारी व्हायरल केल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक श्याम तास्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना केंद्र संचालक पदावरून तत्काळ हटवण्यात आले.
पोलिसांनी अमोल बळीराम राठोड (रा. कोठारी, ता. महागाव) याला ताब्यात घेतले आहे. २१ फेब्रुवारीला तो केंद्रावर आला असताना नजर चुकवून त्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जालना : उत्तरे व्हायरल,
तिघांना पोलिस कोठडी
बदनापूर (जि. जालना) : दहावीच्या परीक्षा केंद्रावर शुक्रवारी मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे व्हायरल केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी बदनापूर पोलिसांत २१ फेब्रुवारीला रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. पोलिसांकडून अविनाश भगवान अंभोरे (२९), कृष्णा अशोक सिरसाट (२३), अजय संजय निकाळजे (२३) यांना अटक करण्यात आली आहे.
भंडारा : केंद्र संचालक, पर्यवेक्षकावर कारवाई
भंडारा : एकोडी (ता.साकोली) येथे बारावीच्या केंद्रावर शनिवारी विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले.
त्याला परीक्षेतून निलंबित केले असून केंद्र संचालक, पर्यवेक्षकांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस केली. ही कारवाई स्व. निर्धनराव पाटील वाघाये महाविद्यालयाच्या केंद्रावर झाली आहे.
छ. संभाजीनगर : विद्यालय कारवाईच्या कचाट्यात
फुलंब्री (जि. छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील पिंपळगाव वळण येथील आदर्श विद्यालयाच्या बारावीच्या परीक्षा केंद्रास शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी भेट दिली असता येथे सामूहिक कॉपी आढळली.
त्यामुळे येथील संस्थेची मान्यता रद्द करण्याचा तसेच उपस्थित केंद्र प्रमुखांसह अन्य कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. येथे भौतिकशास्त्राच्या पेपरच्या वेळीही कॉपी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती.