मराठा आरक्षण, शेतकरी विधेयकावर उद्धव ठाकरे-शरद पवारयांच्यात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 06:35 AM2020-09-20T06:35:24+5:302020-09-20T06:35:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी पाऊण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी पाऊण तास चर्चा झाली. मराठा आरक्षण, संसदेतील शेतकरी विधेयक, ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आदी मुद्द्यांवर या वेळी चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात अंतरिम स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कुठली भूमिका घ्यायची, यावर बैठकीत विचार झाला. नव्याने अध्यादेश काढून मराठा आरक्षण द्यावे, असे मत पवार यांनी अलीकडे व्यक्त केले होते. मात्र, ते कायद्याच्या चौकटीत शक्य होणार नाही, असे समोर आले. आता सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात मोठे घटनापीठ तातडीने स्थापन करावे आणि आधी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी, अशी विनंती राज्य सरकार करेल. याबाबतही दोघांत चर्चा झाली.
नरेंद्र मोदी सरकारच्या तीन शेतकरी विधेयकासंदर्भात राष्ट्रवादी आणि शिवसेनेने कुठली भूमिका घ्यावी, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. हे तिन्ही कायदे घाईघाईने मंजूर करून घेण्याऐवजी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवावेत आणि विविध पक्षांना असलेल्या शंकांचे निरसन करावे, अशी भूमिका राष्ट्रवादी, शिवसेनेतर्फे घेतली जाण्याची शक्यता आहे.
शहरांसह राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. सरकारच्या उपाययोजनांची माहिती ठाकरे यांनी पवार यांना दिली. यासंदर्भात पवार यांनी काही सूचना केल्या. इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनावरून झालेल्या मानापमानासंदर्भातही चर्चा झाली.