जातीय तणावाबाबत पक्ष-संघटनांशी चर्चा
By admin | Published: July 18, 2016 04:46 AM2016-07-18T04:46:05+5:302016-07-18T04:46:05+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यात जातीय तणावाचे प्रसंग
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यात जातीय तणावाचे प्रसंग उद्भवू नयेत, यासाठी सर्व राजकीय पक्षांचे नेते आणि विविध संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले.
ते म्हणाले की, जिल्ह्यात या आधीही तणावाचे प्रसंग घडले आहेत. बलात्कार व हत्येतील आरोपींचा संबंध जातीशी जोडणे योग्य नाही. आरोपी कोणत्याही जातीचा असला तरी त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.
कोणतेही प्रकरण जातीयवादावर जाऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था आणि शांतता टिकावी यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मदतीचे आश्वासन
पीडित मुलीच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून तातडीने आर्थिक आणि इतर स्वरुपाची मदत दिली जाईल. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना विनंती केली जाईल. तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
चारित्र्यहनन करू नका
कृषी मंत्री राम शिंदे यांच्यासोबत बलात्कार प्रकरणातील आरोपीचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत. प्रत्यक्षात फोटोतील व्यक्तीचे नाव संतोष नाना भवाळ आहे. आरोपीचे नाव संतोष गोरख भवाळ आहे. विरोधी पक्षनेत्यांनी शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यापूर्वी आणि त्यांच्या चारित्र्यहननाच्या प्रयत्नापूर्वी निदान खातरजमा करायला हवी होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
>मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन क्रुरपणे हत्या झाल्याची घटना दिल्लीतील ‘निर्भया’पेक्षा भयानक आहे. मात्र गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अथवा गृह राज्यमंत्र्यांना घटनास्थळी जाण्याची फुरसत मिळालेली नाही. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस पत्रकारांशी बोलताना विखे-पाटील आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. राज्यात कायद्याची भीतीच राहिली नाही. या घटनेने पुरोगामी राज्याची लाज वेशीवर टांगली गेली, असे धनंजय मुंडे म्हणाले. एकीकडे या क्रुर घटनेचे तीव्र पडसाद उमटत होते तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री व स्थानिक आमदार राम शिंदे कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी कधी स्वीकारायची, या विवंचनेत अडकून पडले होते. त्यामुळे दोन दिवसांनी ते घटनास्थळी गेले, असा आरोप विरोधकांनी केला.
>आरोपींवर अंडे फेकले
अहमदनगर : अटक केलेल्या दोन आरोपींवर काही तरुणांनी जिल्हा न्यायालयाच्या आवारात अंडे फेकले. तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना कोपर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी बांगड्या दाखवून निषेध केला.
अटकेतील आरोपी जितेंद्र बाबुलाल शिंदे यास २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर संतोष गोरख भवाळ (३०, रा. कोपर्डी) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) यास दुपारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली. कामकाज संपल्यानंतर बुरख्यातून आरोपींना बाहेर नेताना शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर अंडे फेकले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर व भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. विविध संघटनातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
भवाळ यांची फिर्याद
मंत्री राम शिंदे यांच्यासोबतचे छायाचित्र हे संतोष उर्फ दादा नाना भवाळ (रा. नान्नज, ता. जामखेड) यांचे असून ते पुण्यात वडापावची गाडी चालवितात. आरोपीचे नाव संतोष गोरख भवाळ, असे आहे. त्यामुळे बदनामी झाल्याप्रकरणी संतोष भवाळ यांनी काही वृत्तवाहिन्या व अज्ञात व्यक्तींविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.