खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 06:34 AM2020-09-24T06:34:25+5:302020-09-24T06:34:47+5:30
‘ती’ बैठक सिंचन प्रकल्पासाठी : जयंत पाटील यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/जळगाव : भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश द्यायचा की नाही यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात बंद दाराआड बैठक झाल्याचे समजते. मात्र ही बैठक राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती देण्याच्या कामासाठी होती, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. तर या बैठकीबाबत आपणास काहीच माहिती नसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मते अजमावून घेण्यासाठी त्यांना मुंबईत बोलावण्यात आले होते. खडसे यांना पक्षात घेतले तर जळगाव जिल्ह्यात पक्ष मजबुतीसाठी त्याचा फायदा होईल, असे मुद्दे काही नेत्यांनी बैठकीत मांडले. सध्या राष्ट्रवादीकडे जळगाव जिल्ह्यात प्रभावी नेता नाही. त्यामुळे खडसे यांना घेतल्यास पक्षाला खान्देशात फायदा होऊ शकेल, अशी चर्चा झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
पाटील म्हणाले की, खडसे ज्या पक्षात आहेत, त्या पक्षाने त्यांच्या नाराजीचा विचार करावा.
मी अद्याप निर्णय घेतलेला नाही
मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. मला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून बोलावणे आहे. माझे सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत माझी चर्चा होत असेल तर हे मी चांगले समजतो.
- एकनाथ खडसे, ज्येष्ठ नेते, भाजप
खडसे यांच्या पक्षप्रवेशास कुणीही विरोध केला नाही. शरद पवार यांनी प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले. आता निर्णय तेच घेतील. - अॅड. रवींद्र पाटील,
जिल्हाध्यक्ष, राष्टÑवादी काँग्रेस
नाथाभाऊ तर आमचेच हो!
नाथाभाऊ हे आमचे जुने, जाणते आणि ज्येष्ठ नेते आहेत. ते कधीही भाजपला नुकसान होईल असा निर्णय घेणार नाहीत, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.