अर्ध्यातासात अर्धनग्न उपोषणाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 06:03 PM2016-10-17T18:03:29+5:302016-10-17T18:03:29+5:30

शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या प्रमुख मागणीसाठी पीडित शेतकऱ्यांनी बळीराजा सेना यांच्या नेतृत्त्वाखाली शिरपूर

The discussion of half-hearted fasting in half | अर्ध्यातासात अर्धनग्न उपोषणाची सांगता

अर्ध्यातासात अर्धनग्न उपोषणाची सांगता

Next

ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. १७ : शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या प्रमुख मागणीसाठी पीडित शेतकऱ्यांनी बळीराजा सेना यांच्या नेतृत्त्वाखाली शिरपूर तहसील कार्यालयासमोर सोमवारी लाक्षणिक अर्धनग्न उपोषण केले. शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी येत्या २४ रोजी लीड (जिल्हा प्रबंधक अग्रणी बँक) बॅँकेची तातडीची बैठक घेण्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितल्यानंतर अवघ्या अर्धा तासात उपोषणाची सांगता झाली. बळीराजा सेनेतर्फे सोमवारी सकाळी ११ वाजता शिरपूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न उपोषण करण्यात आले़.

यावेळी बळीराजा सेनेचे अध्यक्ष स्वप्नील जाधव, प्रताप पावरा, युवराज भील, सुरेश पुजदेकर, योगेश ठाकरे, प्रशांत देशमुख उपस्थित होते़ या आंदोलनाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, सेनेचे उपजिल्हा प्रमुख राजू टेलर, तालुका प्रमुख भरतसिंग राजपूत, राष्ट्रवादीचे चंदनसिंग राजपूत, नीलेश गरूड आदींनी भेट देवून पाठिंबा दर्शविला़

हेलपाटे मारूनही दिले जात नाही पीक कर्ज
शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी वारंवार हेलफाटे मारून सुध्दा बँकाकडून कर्ज दिले जात नाही़ बँकेच्या मुजोर अधिकारी शेतकऱ्यांना अरेरावी करतात. त्यांच्याशी मनमानीपणे वागतात. त्यामुळे कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदन यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी दिले होते. मात्र, प्रश्न सुटला नाही. यानंतर १५ जुलैला तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून ३ आॅक्टोबर रोजी लोकशाही दिनाच्या दिवशी स्मरण पत्र देण्यात आले़ आजतागायत अरेरावीने व मनमानी कारभार करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तर दूरच पण पीडित शेतकऱ्यांच्या निवेदनाची साधी दखल सुध्दा प्रशासनाने न घेतल्यामुळे सोमवारी उपोषण करण्यात आले.

बैठकीत अधिकाऱ्यांना धरणार धारेवर
तहसीलदार महेश शेलार व पुरवठा अधिकारी सोमवंशी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली असता, त्यांना सांगण्यात आले की, या संदर्भात लीड बँकेचे सर्व मॅनेजर यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात आपल्या अडचणी व समस्या मांडाव्यात असे सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले़ त्यामुळे यापुढे होणाऱ्या बैठकीत त्रस्त शेतकरी पीक कर्ज न देणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रबंधक अग्रणी बँक धुळे यांच्या सोबत २४ रोजी दुपारी ४ वाजता येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये आंदोलनकर्त्यांसोबत बैठकीचे आयोजन केले आहे़ तालुक्यातील शेतकऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार महेश शेलार यांनी केले आहे़

Web Title: The discussion of half-hearted fasting in half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.