विधान परिषदेसाठी खडसे, मुंडे, अहिर यांच्या नावांची चर्चा; सर्वपक्षीयांची खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:44 AM2022-06-08T06:44:01+5:302022-06-08T06:44:52+5:30
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे; तर, १० तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे.
मुंबई : राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूकही तोंडावर आली असल्याने सर्वपक्षीय नेते मंडळींची खलबते सुरू आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, सचिन अहीर, आदी नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.
विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होणार आहे. त्यासाठी ९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे; तर, १० तारखेला राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे एकीकडे राज्यसभेची मोर्चेबांधणी सुरू असली तरी विधान परिषदेसाठीही खलबते सुरू आहेत. या १० जागांसाठी कोणत्या पक्षातून कोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
शिवसेनेकडून मुंबईतील सचिन अहीर आणि नंदुरबार येथील आमशा पाडवी यांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे पक्षातील महत्त्व आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक पाहता, त्यांना पुन्हा एकदा संधी देत मंत्रिपद कायम राखले जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावेळी ‘योग्य ती काळजी घेऊ’, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. विधान परिषदेच्या अनुषंगाने अलीकडेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी अहीर यांच्याशी दीर्घ चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे सध्या अहीर यांच्याऐवजी देसाई कायम राहणार असल्याचाही तर्क लढविला जात आहे. तर, नंदुरबार-धुळे पट्ट्यात शिवसेना वाढविण्याच्या दृष्टीने आमशा पाडवी यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ नेत्यांकडून पाडवी यांना फोनही गेल्याचे कळते.
भाजपला चार जागा सहज जिंकता येणार
संख्याबळानुसार भाजपला चार जागा सहज जिंकता येणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी देण्याचे नक्की झाल्याचे समजते; तर, पंकजा मुंडे यांचेही पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातून त्यांची राज्यात घरवापसी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, दरेकर-लाड वगळता अद्याप अन्य नावांवर चर्चा सुरू असल्याचे समजते.
काँग्रेसची नावे आज जाहीर होणार
कॉँग्रेस उमेदवाराचे नाव आज, बुधवारी नक्की केले जाणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.
रामराजे नाईक-निंबाळकर कायम?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना कायम ठेवणार असल्याचे समजते. दुसऱ्या जागेसाठी भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा आहे. पुढील फेरबदलात मंत्रिमंडळात त्यांच्या समावेशाची चर्चा आहे. या नावांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.
या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून लवकरच अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
- खासदार संजय राऊत, शिवसेना