Vinod Tawde: विनोद तावडे राज्यसभेवर जाणार? पीयूष गोयल यांच्याही नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 07:28 AM2022-05-14T07:28:52+5:302022-05-14T07:29:04+5:30
संख्याबळानुसार भाजपला महाराष्ट्रातून दोन उमेदवार स्वबळावर राज्यसभेत पाठविता येतात. सध्या भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेत आहेत.
- सुरेश भुसारी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या भाजपच्या उमेदवाराबद्दल उत्सुकता असून, दोन जागांसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचे नाव शर्यतीत असल्याचे समजते.
संख्याबळानुसार भाजपला महाराष्ट्रातून दोन उमेदवार स्वबळावर राज्यसभेत पाठविता येतात. सध्या भाजपचे तीन उमेदवार राज्यसभेत आहेत. त्यांपैकी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पुन्हा राज्यसभा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोयल राज्यसभेतील सत्तारूढ पक्षाचे नेतेसुद्धा आहेत. उर्वरित एका जागेसाठी खरी रस्सीखेच सुरू आहे. सध्या राज्यसभेत असलेले डॉ. विनय सहस्रबुद्धे व डॉ. विकास महात्मे यांना उमेदवारी पुन्हा मिळणार काय? हा मुख्य प्रश्न आहे. डॉ. सहस्रबुद्धे यांच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा असलेले भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्षपदही आहे. डॉ. सहस्रबुद्धे व डॉ. महात्मे पहिल्यांदाच राज्यसभेत गेले आहेत. दोन्ही सदस्यांचा राज्यसभेतील सहभागही चांगला राहिला आहे.
धक्कातंत्राचा वापर?
भाजपकडून धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याची घोषणा केल्यामुळे भाजपमध्ये नेमके कोणते समीकरण समोर येईल, हे सांगता येत नाही.
संभाजीराजेंना पाठिंबा दिल्यास पुन्हा मराठा समाजाला भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर भाजपकडून अनपेक्षितपणे एखादे वेगळेच नाव समोर येऊ शकते.