आर्थिक अपयश झाकण्यासाठी देशभक्तीची चर्चा
By Admin | Published: March 7, 2016 03:37 AM2016-03-07T03:37:29+5:302016-03-07T03:37:29+5:30
आर्थिक आघाडीवर सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आक्रमकपणे देशभक्तीची चर्चा करण्यात येत असल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली.
मुंबई : आर्थिक आघाडीवर सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आक्रमकपणे देशभक्तीची चर्चा करण्यात येत असल्याची टीका, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली. आर्थिक ओझ्याखाली दबलेले सामान्य नागरिक आणि शेतकरी वर्गाच्या नाराजीचे रूपांतर आंदोलनात होऊ नये, यासाठीच देशभक्तीचा मुद्दा पुढे करण्यात आल्याचे येचुरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुरोगामी संस्था, संघटना आणि डाव्या आघाडीच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित चर्चासत्रात येचुरी म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची आक्रमक विचारधारा थोपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी देशभक्तीच्या भावनेचा दुरुपयोग केला जात आहे.’
प्रत्यक्ष करात सूट देऊन केंद्र सरकारने धनदांडग्यांची सोय केली. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ६ लाख ११ हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचे खुद्द सरकारनेच मान्य केले आहे. धनदांडग्यांना सवलत देणारे सरकार सामान्य जनतेवर मात्र अप्रत्यक्ष कराचा बोजा लादत आहे. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या २६ टक्क्क््यांनी वाढल्याचा आरोप येचुरी यांनी केला. मोदी सरकारला हटविण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे येचुरी या वेळी म्हणाले. मात्र, प. बंगालमधील आगामी निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी अथवा युतीची शक्यता नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांसाठी भाजपाने जोरदार तयारी चालविली आहे. मात्र, आसाम वगळता उर्वरित चार राज्यांमध्ये भाजपाचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाला स्थान नसल्याचे येचुरी म्हणाले. (प्रतिनिधी)