जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच
By Admin | Published: January 16, 2017 03:13 AM2017-01-16T03:13:25+5:302017-01-16T03:13:25+5:30
शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये युत्या, आघाड्यांसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच
आविष्कार देसाई,
अलिबाग- रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला अथवा दोन्ही पक्षांना एकत्र येऊनही सत्ता काबीज करता येणार नाही. यासाठीच शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा या प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये युत्या, आघाड्यांसाठी चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच आहे. राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट झालेली नसल्याने त्या त्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
२१ फेब्रुवारी रोजी ५९ रायगड जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समितींच्या जागांसाठी निवडणुका होत आहेत. रायगड जिल्हा परिषदेने सुमारे १०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करुन अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. जिल्हा परिषदेला राज्यासह केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी कोट्यवधींंचा निधी येतो. त्यामुळे जिल्हा परिषदेतील तिजोरीच्या चाव्या आपल्याचकडे राहाव्यात, असे सर्वच पक्षांना वाटते. परंतु प्रत्येक राजकीय पक्षांची ताकद कमी-अधिक असल्याने त्यांना युती, आघाडीशिवाय पर्याय नाही.
सध्याच्या संख्याबळाचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक २० जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर कर्जत, रोहे, तळा, माणगाव, म्हसळा आणि श्रीवर्धन या सहा पंचायत समिती या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्या खालोखाल शेकापकडे १९ जिल्हा परिषद सदस्य आणि अलिबाग, पेण, पनवेल, मुरुड, पाली या पाच पंचायत समितीवर लाल बावटा फडकला आहे. शिवसेनेकडे १४ जिल्हा परिषद सदस्य, उरण, खालापूर, महाड आणि पोलादपूर या चार पंचायत समितींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. भाजपा आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक जिल्हा परिषद सदस्य आहे.
रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता आहे, तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे. त्यामुळे ते चांगल्याच मजबूत स्थितीमध्ये आहेत. त्यांची काही जागांवर बोलणी अद्यापही सुरु आहेत. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे यांचा मतदार संघ संपुष्टात आल्याने त्यांना शेकापच्या ताब्यातील खांडस मतदार संघ मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. परंतु शेकाप तो मतदार संघ देण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येते. त्यामुळे टोकरे यांना कोठून उमेदवारी द्यायची याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्हा परिषदेवर एका पक्षाची सत्ता येणे सोडाच पण दोन पक्षांनाही कठीण जाणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू स्थिती येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शेकाप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये काँग्रेसलाही सामावून घेण्याबाबत प्रदेश पातळीवर बोलणी सुरु आहेत. याला राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनीही ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला.
स्थानिक पातळीवरील राजकारणाला वेग
स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जाण्याबाबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते इच्छुक आहेत. परंतु अद्यापही वरिष्ठ स्तरावरुन युती, आघाडीबाबत आदेश आलेले नाहीत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत यांनी सांगितले. भाजपाची जिल्ह्यामध्ये ताकद नसल्याने त्यांच्या युतीबाबत अद्याप हे स्पष्ट केलेले नाही.
शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी अलिबाग आणि पेण तालुक्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना अशी मोट बांधण्यात आली आहे. त्या दिशेने दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. अन्य ठिकाणीही युती करण्याबाबत शिवसेना प्रयत्न करीत आहे.