कुलगुरूंच्या परतण्यावर विद्यापीठात चर्चा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 05:17 AM2017-09-11T05:17:05+5:302017-09-11T05:17:16+5:30
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालात झालेल्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आता निकालाचे काम पूर्ण होत आल्यावर कुलगुरू देशमुख यांनी पुन्हा रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले.
मुंबई : आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालात झालेल्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. आता निकालाचे काम पूर्ण होत आल्यावर कुलगुरू देशमुख यांनी पुन्हा रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. पण तेथून काहीच उत्तर न आल्याने त्यांनी थेट दिल्लीशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे कुलगुरूंच्या वापसीची जोरदार चर्चा सुरू असली तरी राज्य सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही.
एप्रिल महिन्यात कुलगुरू देशमुख यांनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची घोषणा केली. पण त्यातील तांत्रिक अडचणींमुळे सप्टेंबर महिना उजाडूनही हजारो विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. निकालाच्या गोंधळामुळे राज्यपालांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर, ९ आॅगस्टपासून कुलगुरू सुटीवर आहेत. यानंतर निकालांचे काम प्रभारी खांद्यावर सोपवण्यात आले. आता निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्या वेळी देशमुख यांनी रुजू होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पण राजकीय वर्तुळात देशमुखांसाठी पूरक वातावरण नाही. राज्यपालांना पत्र पाठवून बरेच दिवस झाले, पण राजभवनाने सध्या फक्त निकालावर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच शिक्षणमंत्र्यांनीही या प्रश्नावर अजून काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
३२ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीच
सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाला तब्बल ३२ हजार ७४५ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. रविवारी ४ हजार ३४९ उत्तरपत्रिकांची तपासणी झाली. तर विद्यापीठाच्या ४७७ निकालांपैकी ४६९ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. अजून ८ निकाल जाहीर झालेले नाहीत.