चर्चा तर होणारच! वंचितच्या उमेदवाराने बुक केली रेंज रोव्हर, फॉर्च्युनर; चार कोटी मोजले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 04:16 PM2024-06-19T16:16:48+5:302024-06-19T16:17:41+5:30
निवडणुकीत पराभूत झालेले असले तरी लगेचच चार कोटींच्या आलिशान गाड्या बुक केल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वंचितचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरसिंग उदगीरकर कमालीचे चर्चेत आले आहेत. निवडणुकीत पराभूत झालेले असले तरी लगेचच चार कोटींच्या आलिशान गाड्या बुक केल्याने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. नरसिंग यांनी एकाचवेळी रेंज रोव्हर, फॉर्च्युनर बुक केली आहे. लोकसभेनंतर बुकिंग आणि विधानसभेनंतर डिलिव्हरी अशी या कार घेण्यामागची कडी जोडली जात आहे.
लातूरमधून काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळगे हे विजयी झाले होते. त्यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना पराभूत केले होते. अशातच वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकाची मते घेऊन पराभूत झाला होता. उदगीरकर यांना 42 हजार 225 मते मिळाली होती.
महत्वाचे म्हणजे निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये नरसिंह उदगीरकर यांनी एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता ही दीड कोटींच्या आत दाखविली होती. तर त्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांच्या आत दाखविले होते. यामुळे कराचा एकही रुपया न भरणाऱ्या व्यक्तीने करोडोंची रेंजरोव्हर आणि फॉर्च्युनर कशी काय घेतली असा सवाल सोशल मीडियात विचारला गेला होता.
या दोन्ही गाड्यांची किंमत ही ४ कोटींच्या आसपास आहे. या गाड्यांची डिलिव्हरी सहा महिन्यानंतर होणार आहे. उदगीरकर हे बडे सरकारी अधिकारी होते. १९८२ मध्ये एमपीएससीतून उद्योग अधिकारी म्हणून जॉईन झाले होते. त्यानंतर ते उद्योग उपसंचालक झाले होते. २०१२ मध्ये त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि व्यवसाय सुरु केला. त्यांची दोन मुले ही बांधकाम व्यावसायिक आहेत.
मुलाचे म्हणणे काय...
सोशल मीडियावर होत असलेले ट्रोलिंग पाहून त्यांच्या एका मुलाने वडिलांनी नाही तर आम्ही त्यांना या कार गिफ्ट केल्याचे म्हटले आहे. वडिलांना गाडी गिफ्ट देण हे चुकीचे आहे का? कशावरून एखाद्याला बदनाम करायचं याची पण एक सीमा असायला हवी. कष्ट करून चांगले राहणे, वागणे योग्य नाही का ? मला विश्वास आहे की माझ्या जवळचे लोक मला ओळखतात. वडील हरले किवा जिंकले त्यांना मोठे सरप्राईज द्यायचे आम्ही ठरविले होते. त्याप्रमाणे आम्ही या कार त्यांना दिल्या आहेत, असे योगेश उदगीरकर म्हणाले.