अशोक चव्हाणांबाबतच्या चर्चा केवळ मीडियातच- माणिकराव ठाकरे
By संतोष वानखडे | Published: September 8, 2022 03:38 PM2022-09-08T15:38:59+5:302022-09-08T15:39:19+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा केवळ मीडियातच आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा केवळ मीडियातच आहेत. प्रत्यक्षात ते कुठेही जाणार नसून, काँग्रेसमध्ये राहतील असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी गुरूवारी (दि.८) वाशिम येथे पत्रकार परिषदेत केला.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने गुरूवारी ठाकरे यांनी स्थानिक विश्राम गृहात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक, प्रदेश सरचिटणीस ॲड. दिलीपराव सरनाईक, डाॅ. जितेंद्र हाधाडे, वाशिमचे प्रभारी तातू देशमुख, प्रदेश सचिव दिलीप भोजराज, प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज राठोड, जि.प. उपाध्यक्ष डाॅ. शाम गाभणे आदींची उपस्थिती होती. यावेळी ठाकरे यांनी भाजप प्रणित केंद्र सरकारने लोकशाही संपविण्याचा घाट घातला तसेच स्वायत्त संस्था व अधिकारी यांचा दुरुपयोग करून दडपशाही चालविली असल्याचा आरोप केला.
वाढती महागाई, खासगीकरण, बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्याच्या उद्देशाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो पायदळ यात्रेला सुरूवात झाली असून, ही यात्रा ९ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले. नांदेड, हिंगोली मार्गे वाशिम येथे पायदळ यात्रा येणार असल्याचेही ठाकरे म्हणाले. यावेळी अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर बोलताना ठाकरे म्हणाले की, केवळ मीडियातच पक्ष प्रवेशाच्या वावड्या उठविण्यात आल्या. एका दिवसापूर्वीच नांदेड येथे चव्हाण यांची भेट झाली असून ते कोणत्याही पक्षात जाणार नाहीत, ते काँग्रेसमध्ये राहतील असा दावाही माणिकराव ठाकरे यांनी केला.