राज्यात ३.६० लाखावर स्मृतिभ्रंश रुग्ण
By admin | Published: December 15, 2015 04:01 AM2015-12-15T04:01:44+5:302015-12-15T04:01:44+5:30
अल्झायमर अॅण्ड रिलेटेड डिसआॅर्डर सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार सन २०१६ पर्यंत अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या लक्षणांचे ३ लाख ६० हजार १०० रुग्ण
नागपूर : अल्झायमर अॅण्ड रिलेटेड डिसआॅर्डर सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार सन २०१६ पर्यंत अल्झायमर (स्मृतिभ्रंश) या लक्षणांचे ३ लाख ६० हजार १०० रुग्ण महाराष्ट्रात असतील, असे २०१० च्या अहवालात म्हटले आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. आमदार सुनील प्रभू, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले की, नेहमीच्या कामात गोंधळून जाणे, वार, तारीख विसरणे, साधी कामे करताना काही गोष्टी विसरणे ही स्मृतीभ्रंश आजाराची लक्षणे आहेत. अल्झायमर अॅण्ड रिलेटेड सोसायटी आॅफ इंडिया या संस्थेने केलेल्या अंदाजित अनुमानानुसार दर १५ वर्षांनी अल्झायमरग्रस्तांची संख्या दुप्पट होत असल्याचे अहवलात दिसून येते. महाराष्ट्रात ४ प्रादेशिक मनोरुग्णालय, १२ जिल्हा मानसिक आरोग्य केंद्र, १४ वैद्यकीय महाविद्यालय तसेच ४ महानगरपालिका रुग्णालयात अल्झायमर (स्मृतिभ्रंश) ग्रस्त रुग्णांना आरोग्य सेवा दिल्या जातात. प्रतिबंधक उपाययोजनांच्या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांना या आजाराची माहिती देण्याकरिता व त्यांचे लवकर निदान होण्याकरिता या आजाराबद्दल माहिती दिली जाते.(प्रतिनिधी)