खडसेंविरोधात हक्कभंग
By admin | Published: March 18, 2016 02:14 AM2016-03-18T02:14:03+5:302016-03-18T02:14:03+5:30
राज्यात २०१२मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची हेतुपुरस्सर चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : राज्यात २०१२मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याची हेतुपुरस्सर चुकीची माहिती देऊन सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला. विखे पाटील म्हणाले, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर १० मार्च रोजी नियम २९३ अन्वये विधानसभेत चर्चा उपस्थित करण्यात आली होती. त्यावर महसूलमंत्री खडसे यांनी १४ मार्च रोजी उत्तर देताना २०१२मध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे सांगितले होते. शासकीय आकडेवारीनुसार २०१५मध्ये सर्वाधिक ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यावरून २०१५मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते. असे असताना खडसे यांनी हेतुपुरस्सर सभागृहाला खोटी माहिती देऊन वस्तुस्थिती लपविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येत असून, त्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी विखे पाटील यांनी केली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी याबाबत तपासून योग्य निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)