साहित्य संमेलनात ठरावांवर अंमल न होणे हा साहित्यिकांचा अपमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:59 PM2020-01-11T23:59:31+5:302020-01-11T23:59:53+5:30
संमिश्र प्रतिक्रिया : सीएए, डिटेन्शन कॅम्प, जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ भूमिकेची मागणी
जान्हवी मोर्ये
डोंबिवली : उस्मानाबाद येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सीएए कायदा, जेएनयूमधील तरुणांना झालेली मारहाण वगैरे विषयांवर निषेधाचे ठराव करावेत, यावरून वादळ उठले आहे. मात्र, केवळ संमेलनात ठराव करून काय उपयोग, असा सवाल करतानाच सरकार जर साहित्यिकांनी केलेले ठराव गांभीर्याने घेऊन त्यावर अंमलबजावणी करणार नसेल, तर असे ठराव करून काय उपयोग, असा सूर काही साहित्यिक व रसिकांनी लावला आहे, तर काही वादविषयांवर साहित्यिकांनी संमेलनाच्या व्यासपीठावर ठोस भूमिका घेतली, हा संदेश लोकांपर्यंत नेण्यासाठी ठराव गरजेचे असल्याचे साहित्यिकांचे म्हणणे आहे.
संमेलनातील ठराव म्हणजे साहित्यिकांचा विचार असतो. पण, त्या ठरावांकडे गांभीर्याने न पाहणे हा साहित्यिकांचा अपमान असल्याची टीका कल्याणमधील साहित्यप्रेमी भिकू बारस्कर यांनी केली आहे. उस्मानाबाद येथील संत गोरोबा काकांच्या नगरीत ९३ वे साहित्य संमेलन सुरू आहे. या संमेलनात नागरिकत्व सुधारणा कायदा, जनगणनेत विविध प्रकारचे २५ प्रश्न विचारले जाणे व नागरिकत्व सिद्ध न होणाऱ्यांची डिटेन्शन कॅम्पमध्ये रवानगी करणे, शिवाय जेएनयूमधील विद्यार्थ्यांना झालेली मारहाण या सर्व घटनांच्या व धोरणांच्या निषेधार्थ ठराव झाला पाहिजे का, याबाबत विचारणा केली असता साहित्यप्रेमींनी ठरावाचे काही होत नसल्याची खंत व्यक्त केली.
संमेलनात एखाद्या विषयावर ठराव येतो, तेव्हा त्याचा प्रभाव पडायला हवा. ठराव प्रभावी होत नसल्याने पुढे कार्यवाही होत नाही. त्यामुळे ठरावाची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी. संमेलनातील ठरावांचा सरकारने गांभीर्याने विचार केल्यास साहित्यिकांचा मान राखला जाईल, असे बारस्कर यांनी सांगितले.
‘जेएनयूच्या घटनेचा ठराव हा योग्यच’
ज्येष्ठ कवी राजीव जोशी यांनी सांगितले की, जेएनयूमधील विद्यार्थ्यांना मारहाण झाली, ही चुकीची गोष्ट आहे. त्यांचा निषेध झालाच पाहिजे. पण, नेमकी ही मारहाण कोणी केली, ते पाहावे. कदाचित, त्यामागे परकीय शक्तीचा हात असू शकतो. संमेलनात याच्या निषेधार्थ ठराव झाल्यास चांगले आहे, पण आपल्याकडे अनेक प्रश्नांवर ठराव होतात, पण त्यांचे पुढे काहीच होत नाही.
चुकीचे उघड होईल!
दीपाली काळे म्हणाल्या की, सध्या ज्या गोष्टी सुरू आहेत, त्या चांगल्याच आहेत. जनगणनेसाठी जास्त प्रश्न विचारणार, त्यामुळे कोठे अवैध धंदे सुरू असल्यास माहिती मिळणार आहे. मग, या प्रश्नांच्या निषेधार्थ संमेलनात ठराव करण्याचा प्रश्नच येत नाही.
चुकीचे निर्णय, कृतीविरोधात ठराव हवेच!
अमरेंद्र पटवर्धन म्हणाले, जेएनयू विद्यार्थी असोत किंवा कुठेही आणि कोणावरही हल्ला हा नक्कीच निषेधार्थ आहे. सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, हिंसक कृत्य करणे यांचा निषेध नक्कीच झाला पाहिजे. नागरिक संरक्षण कायदा हा विषय प्रथम नीट समजून घेतला पाहिजे. अनेकांना त्याची नक्की माहिती नाही. अर्धवट माहितीच्या आधारे उगाच वैयक्तिक किंवा राजकीय स्वार्थासाठी अनुचित कृत्ये घडवणे हे निषेधार्ह आहे. चुकीचे निर्णय व कृती याच्या निषेधाचे ठराव साहित्य संमेलनात झाले, तर उत्तम होईल कारण साहित्य संमेलन हे खूप मोठे व्यासपीठ आहे.