शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात? अरविंद सावंत स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 03:54 PM2022-08-13T15:54:18+5:302022-08-13T15:55:15+5:30
यावेळी, शिवसेनेने त्यांचे परतीचे दोर अद्यापही कापलेले नाहीत? असे विचारले असता, सावंत म्हणाले...
शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राज्यातील ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार आले. यानंतर नुकताच शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, हे नाराज आमदार आता पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे म्हटले जातेय, असे विचारले असता, "आदीत्य ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करताना सांगत आले आहेत, की आमचे दरवाचे खुले आहेत. त्यामुळे ज्यांना वाटते त्यांनी अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाहीत," असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. ते लोकमतसोबत बोलत होते.
यावेळी, शिवसेनेने त्यांचे परतीचे दोर अद्यापही कापलेले नाहीत? असे विचारले असता, सावंत म्हणाले, आम्ही त्यांना म्हणालोय का, की तुमचे परतीचे दोर कापले आहेत? पण कुठल्या गद्दारांना क्षमा करावी, हा मिलियन डॉलर प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच स्वतःचे परतीचे दोर कापले आहेत, असेही अरविंद सावंत यावेळी म्हणाले.
इडीच्या भीतीपोटी घाबरलेल्यांसाठी संजय राऊत आदर्श -
सावंत म्हणाले, ती सर्व असंतुष्ट माणसं, घाबरलेली माणसं, इडीच्या भीतीपोटी घाबरलेली माणसं आहेत. खरे तर इडीच्या भीतीपोटी घाबरलेल्या माणसांसाठी संजय राऊत आदर्श आहेत. ते न घाबरदा ईडीच्या कारवाईला सामोरे जातात. घाबरलेली लोकं ब्लॅकमेलर लोकं, ईडीच्या कारवाईला भीऊन पळालेली माणसं, यांचा हिंदूत्वाशी काही संबंध नाही. यांचा भगव्याशीही काही संबंध नाही. यांचा निष्ठेशीही काही संबंध नाही. हे सर्व जण गद्दारच आहेत.
यावेळी, संपर्कात किती लोक आहेत, असे विचारले असता, मला त्या गोष्टीचे महत्व नाही. धारिष्ट्य नसलेल्या माणसांबद्दल काय बोलायचं आपण? असे उत्तर अरविंद सावंत यांनी दिले.
अरविंद सावंत यांंची संपूर्ण मुलाखत -