आदर्शनगरमध्ये घाणीचे साम्राज्य
By admin | Published: September 19, 2016 01:52 AM2016-09-19T01:52:05+5:302016-09-19T01:52:05+5:30
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील आदर्शनगरातील मैदानावर साचलेल्या सांडपाण्याने संपूर्ण मैदानच घाणीच्या विळख्यात सापडले
मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील आदर्शनगरातील मैदानावर साचलेल्या सांडपाण्याने संपूर्ण मैदानच घाणीच्या विळख्यात सापडले आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे लगतच्या वस्त्यांमध्ये रोगराई पसरण्याची भीती असून, यावर महापालिकेने ताबडतोब उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
आदर्शनगर येथील मैदानात गेल्या ३ महिन्यांपासून गटाराचे पाणी साचले आहे. सांडपाण्यालगत कचराही जमा झाला आहे. त्याकडे महापालिकेसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुनील कुमरे यांनी केला. आरे कॉलनीच्या आदिवासी पाड्यात वसलेल्या आदर्शनगरात मोठी लोकवस्ती आहे. येथील गटारांची दुरवस्था झाली आहे. सांडपाणी रहिवाशांच्या दारांपर्यंत, रस्त्यात आणि मैदानात पसरते आहे. आरेतील विकासकामांना ना-हरकत प्रमाणपत्राची अट आहे. त्यामुळे येथील मूलभूत सुविधांची कामे रखडली असून, आरे कॉलनीतील २७ आदिवासी पाडे आणि ४६ झोपडपट्ट्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. (प्रतिनिधी)