विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशाही डीजेला भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2016 12:45 AM2016-09-17T00:45:04+5:302016-09-17T00:45:04+5:30
गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल-ताशाचा आव्वाज डीजेला भारी पडला आहे. लक्ष्मी रस्त्यावर ढोलांच्या आवाजाने अनेकदा १०० डेसिबलची पातळी ओलांडली
पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल-ताशाचा आव्वाज डीजेला भारी पडला आहे. लक्ष्मी रस्त्यावर ढोलांच्या आवाजाने अनेकदा १०० डेसिबलची पातळी ओलांडली, तर डीजेचा दणदणाट जवळपास ११० डेसिबलपर्यंत पोहचला होता. सकाळी ६ वाजल्यानंतर डीजेच्या गोंगाटात वाढ झाल्याचे दिसून आले.
कॉलेज आॅफ इंजिनिअरींगच्या उपयोजित विज्ञान विभागाच्या १० विद्यार्थ्यांनी लक्ष्मी रस्त्यावर ध्वनीप्रदुषणाची पातळी मोजली आहे. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुक सुरू झाल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत दहा चौकांमध्ये या विद्यार्थ्यांनी आवाजाची पातळी तपासली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ध्वनीपातळी कमी झाली असली तरी मिरवणुकीचा वेळ मात्र कमी झालेला नाही. त्यामुळे आवाज कमी होवूनही त्याचा परिणाम तितकाच जाणवला. संपुर्ण लक्ष्मी रस्त्यावर २४ तासातील एकंदर आवाजाची सरासरी पातळी ९२.६ डेसिबल नोंदविली गेली. त्यामध्ये ढोल-ताशा व डीजेच्या आवाजात फारसा फरक जाणवला नाही, असेही महत्वपुर्ण निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. साधारणपणे माणसाचे कान ७० ते ८० डेसिबल आवाज सहन करू शकतात.
लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकापर्यंत ध्ननीपातळी एकदाही ८५ डेसिबलच्या खाली आली नाही. गुरूवारी दुपारी १२ वाजता या चौकांमध्ये सरासरी ९०.६ डेसिबल तर रात्री ८ वाजता सरासरी ९३.७ डेसिबल आवाजाची नोंद झाली. दुपारी चार वाजता कुंटे चौकात ढोल-ताशाच्या आवाजाने शंभरी ओलांडली. हा आवाज १०३.८ डेसिबलपर्यंत पोहचला. रात्री बारानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत हा आवाज काहीसा कमी होता. तरीही पहाटे चार वाजता ध्वनीपातळी सरासरी ८८ डेसिबलपर्यंत पोहचली होती. पहाटे चार वाजता होळकर चौकात सर्वाधिक ९६.७ डेसिबल आवाज होता. सकाळी आठ वाजता मात्र डीजेचा दणदणाट १०० च्या आसपास होता.
‘डीजे’ने वाढवला आव्वाज... : नियमानुसार रात्री बारानंतर सर्वच रस्त्यांवरील डीजे बंद करण्यात आले. काही मंडळे आवाज बंद केल्यानंतर मोरयाच्या जयघोषात पुढे गेली. मात्र, अनेक मंडळांनी रस्त्याच्या कडेला रथ उभे करून सकाळी सहा वाजण्याची वाट पाहिली. सकाळी सहा वाजल्यानंतर पुन्हा डीजेचा दणदणाट सुरू झाला. लक्ष्मी रस्त्यासह केळकर, कुमठेकर आणि टिळक रस्त्यावरही डीजेच्या आवाजाने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी तरूणाईची गर्दी असल्याने ‘डीजे’चा आवाज आणखीनच वाढला. त्यामुळे तरूणाईच्या उत्साहालाही उधाण आले. परिणामी मंडळांच्या मिरवणुका पुढे सरकतच नव्हत्या. त्यामुळे पोलिसांना अनेकदा हस्तक्षेप करावा लागला. आवाजाची पातळी सातत्याने वाढतच चालली होती. टिळक चौकात चारही रस्त्यांनी टिळक चौकात मिरवणुका आल्यानंतर तर कान बधिर होवून गेले. डीजेच्या आवाजाची स्पर्धा असल्यासारखे चित्र पाहायला मिळाले.