Narayan Rane : दिशा सालियनची बलात्कार करून हत्या; नारायण राणे यांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 12:57 PM2022-02-19T12:57:46+5:302022-02-19T12:59:46+5:30
केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत गंभीर आणि काही खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी, दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे...
मुंबई - सध्या राज्यातील भाजप-शिवसेना संघर्ष चांगलाच पेटल्याचे दिसत आहे. दोन्हीही पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांविरोधात दावे-प्रतिदावे आणि आरोपप-प्रत्यारोप केले जात आहेत. राज्य, राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा आखाडा बनले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे बार झडत आहेत. असे असतानाच केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेत गंभीर आणि काही खळबळजनक आरोप केले आहेत. यावेळी, दिशा सालियनची बलात्कार करून हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे.
दिशा आत्महत्या का करेल? -
दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली, पण आत्महत्या झाल्याचे दाखवण्यात आले. दिशा आत्महत्या का करेल? असे म्हणत राणे यांनी, दिशा सालियानचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट का आला नाही? दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची तेथील रजिस्टरची पानं का फाडली गेली? असे प्रश्न उपस्थित केले. एवढेच नाही तर, जेव्हा सुशातंसिंह राजपूतला हे प्रकरण समजले, तेव्हा मी यांना सोडणार नाही, असे सुशात म्हणाला होता. यानंतर, त्याच्या घरात बाचाबाची झाली. त्यातून सुशांतसिंह राजपूत याचीही हत्या झाली, असा दावाही नारायण राणे यांनी यावेळी केला.
मर्डर केस कुणालाही पचवता येत नाही -
सुशांतच्या हत्येचा दावा करतानाही, सुशांतच्या सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब झाले? ठराविक माणसाची रुग्णवाहिका कशी आली? रुग्णालयात कसे नेले गेले, पुरावे कुणी नष्ट केले? असे सवाल खडे करत, या सर्वांची चौकशी होणार, असा इशाराही राणे यांनी दिला आहे. याच वेळी त्यांनी रमेश मोरेची हत्या कुणी केली आणि का केली? असा प्रश्नही उपस्थित केला. तसेच, मर्डर केस कुणालाही पचवता येत नाही आणि ती कधीच क्लोज होत नाही, असेही राणे म्हणाले.
...दुसरा कुणी असता तर राजीनामा दिला असता -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना राणे म्हणाले, मला राजकारण शिकवू नये. कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही, पण दुसरा कुणी असता तर राजीनामा दिला असता. यावर, ते थांबले नाही, तर शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे असेल तर लोककल्याणकारी कामे करा. मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, कॅबिनेटमध्ये जात नाहीत, सभागृहात जात नाहीत. कोरोनात इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त दीड लाख लोक येथे मेले आणि हे म्हणतात आमचं कतृत्व. एवढे मेले त्याचे काही वाटत नाही, असेही राणे यावेळी म्हणाले.