बेईमान राज्यकर्त्यांना हाकला
By admin | Published: October 28, 2015 01:06 AM2015-10-28T01:06:35+5:302015-10-28T01:06:57+5:30
मुख्यमंत्र्यांचे आवाहन : महापालिकेतील सत्तेच्या चाव्या दिल्यास तिजोरी भरून देण्याची ग्वाही
कोल्हापूर : कर्तृत्वशून्य व बेईमान राज्यकर्त्यांमुळे गेल्या पंधरा वर्षांत कोल्हापूर शहराचा विकास झाला नाही. महानगरपालिकेची तिजोरी कायम रिकामी राहिली म्हणूनच यापुढे शहराचा विकास करायचा असेल, मोठे प्रकल्प हाती घ्यायचे असतील तर या बेईमान राज्यकर्त्यांना हाकला आणि महापालिकेतील सत्तेच्या चाव्या तुम्ही चंद्रकांतदादा पाटील यांच्या हाती सोपवा. आम्ही राज्य सरकारतर्फे कोल्हापूरची तिजोरी भरून देऊ’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री येथे जाहीर सभेत बोलताना दिली. कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडी, रिपाइं व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
मुख्यमंत्री आपल्या भाषणात पुढे म्हणाले, कोल्हापूर शहराला ‘देशातील नंबर१’चे शहर बनवू, स्मार्ट शहर बनवू, असे सर्वच पक्षांचे नेते सांगत आहेत; पण तुम्हाला कोणी थांबविले होते का? देशात आणि राज्यात तुमचे सरकार होते. त्यावेळी महाराष्ट्रासह कोल्हापूर शहराचा सत्यानाश केला आणि ‘नंबर १’चे शहर करण्याचे आता कोणत्या तोंडाने सांगत आहात. तुम्ही शहराच्या भल्याची कामे केली असती तर आज मते मागण्यासाठी फिरायची वेळही आली नसती; पण आता जनतेने ठरविले आहे. तुम्हाला जनता हद्दपार करेल, असे फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी आपल्या भाषणात कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, तुमचे राजकारण केवळ स्वाहाकाराचे, खिसे भरण्याचे आहे. कोल्हापूच्या टोलचा प्रश्न चांगलाच गाजला पण हा टोल कोणी आणला? आम्ही हा टोल रद्द करण्यासाठी समिती स्थापन केली. काम सुरू आहे; परंतु या प्रकल्पाचे एक-एक गुपित बाहेर यायला लागले आहे. ज्या दर्जाचे रस्ते व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत. पैसा कोणाच्या खिशात गेला याचे उत्तर जनतेला द्यायचे सोडून वर्षभरात टोल रद्द करता आला नाही, म्हणून वर उजळमाथ्याने आम्हालाच विचारता ? राज्यात सत्ता आल्यावर पहिल्या सहा महिन्यांत चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील ६४ नाक्यांवरील टोल रद्द केला. त्यात सर्वसामान्यांचीच ७० टक्के वाहने टोल भरत होती. त्यांना आता तो भरावा लागत नाही. तुम्हाला टोलचा मलिदा खायचा होता म्हणून ते सुरू ठेवले होते. या मलिद्याचा जाब जनताच विचारणार आहे.गेल्या पंधरा वर्षांत राज्यात एवढी प्रचंड घाण करून ठेवली आहे. त्यामुळे ती साफ करण्यासाठी जरा वेळ लागेल. तुम्हाला जे पंधरा वर्षांत जमले नाही ते आम्हाला एक वर्षात कसे जमेल, असा सवाल करत राज्य तसेच केंद्र सरकारने हाती घेतलेल्या स्मार्ट सिटी, अमृत योजना, सिंचनाच्या योजना, हागणदारी मुक्त शहर योजना, ४० शहरांचे विकास आराखडे मंजुरी आदींबाबत घेतलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी दिली. नागपूर महानगरपालिकेने हाती घेतलेल्या सांडपाणी प्रक्रिया, कचरा निर्गत प्रकल्पातून पैसे कसे मिळतात हेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पाटलांची कलमी तलवार अशीच चालू लागली तर...
महानगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाहीत. भविष्यकाळात शहराचा विकास कसा होईल, अजेंडा काय राहील यावर न बोलता सर्वच पक्षांचे नेते केवळ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर हल्ला करत आहेत. सर्वच बेईमान नेत्यांमध्ये एक प्रामाणिक आणि सज्जन पालकमंत्री लाभला म्हणूनच या बेईमानांचे पित्त खवळले.
पाटलांची कलमी तलवार अशीच चालायला लागली तर एक दिवस आपणालाही तुरुंगामध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही, या भीतीपोटी ही मंडळी खवळली आहेत. एका प्रामाणिक मंत्र्याची बेईमानांत कशी अडचण होते ते कोल्हापूरकर पाहत आहेत; परंतु दादा, बेईमानांचा जमाना आता संपला आहे. त्यांच्या विरुद्धची लढाई अशीच सुरू ठेवा. राज्याचे सरकार तुमच्या सोबत असेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
तीन नोव्हेंबरला विजयी मेळावा
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे भाजप, ताराराणी महायुतीच्या कार्यकर्त्यांवर खोट्या तक्रारी करून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विजय आता महायुतीचाच होणार यात शंका राहिलेली नाही. तेव्हा ३ नोव्हेंबरला गांधी मैदानावर विजयी मेळावा घेतला जाईल, त्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मेळाव्याचे निमंत्रण स्वीकारावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मुख्यमंत्र्यांची शायरी
एक वर्षात राज्यातील भाजप सरकारने काय काम केले, अशी विचारणा दोन्ही काँग्रेसकडून केली जात आहे. त्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शायरीमध्ये उत्तर दिले :
अब तो गधे भी गुलाब मॉँगते हैं...
चोर-उचक्के इन्साफ मॉँग रहे हैं,
जिन्होंने साठ साल लूटा...
वो एक साल का हिसाब मॉँगते है...!
पाटलांची कलमी तलवार अशीच चालू लागली तर...
महानगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलत नाहीत. भविष्यकाळात शहराचा विकास कसा होईल, अजेंडा काय राहील यावर न बोलता सर्वच पक्षांचे नेते केवळ पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर हल्ला करत आहेत. सर्वच बेईमान नेत्यांमध्ये एक प्रामाणिक आणि सज्जन पालकमंत्री लाभला म्हणूनच या बेईमानांचे पित्त खवळले.
पाटलांची कलमी तलवार अशीच चालायला लागली तर एक दिवस आपणालाही तुरुंगामध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नाही, या भीतीपोटी ही मंडळी खवळली आहेत. एका प्रामाणिक मंत्र्याची बेईमानांत कशी अडचण होते ते कोल्हापूरकर पाहत आहेत; परंतु दादा, बेईमानांचा जमाना आता संपला आहे. त्यांच्या विरुद्धची लढाई अशीच सुरू ठेवा. राज्याचे सरकार तुमच्या सोबत असेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
दादा म्हणजे दूत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भरभरून कौतुक केले. ‘जनता आणि राज्य सरकार यांच्यामध्ये दुवा साधणारा एक चांगला दूत चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने मिळाला आहे. चोवीस तास कोल्हापूरच्या विकासाचा ध्यास दादांना लागला आहे. माझ्याकडील नगरविकास खात्याचा सगळा निधी दादा घेऊन जातात की काय याची मला काही वेळेला चिंता लागून राहिलेली असते,’ असे फडणवीस म्हणाले. सत्तेचा गैरवापर झालामागच्या पाच वर्षांत ज्यांनी सत्तेचा गैरवापर केला त्यांना जनतेने धडा शिकविला, आता महानगरपालिकेतही त्याची पुनरावृत्ती होईल. तुम्ही काम करण्यास असमर्थ ठरला म्हणून जनता आमच्या हाती सत्ता देईल, असे आमदार अमल महाडिक म्हणाले. त्यांच्या हाती सांगण्यासारखे काही नाही म्हणून आम्हा महाडिक कुटुंबावर टीका केली जात असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
तुमच्या पोटात का दुखते?
महाडिक कुटुंबावर टीका करणाऱ्यांना सुनील मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले. जनतेच्या हितासाठी ताराराणी आघाडीने भाजपशी युती केली; परंतु महाडिक कुटुंबाच्या दारात जाऊन, त्यांच्या पायावर डोकं टेकून आशीर्वाद घेतले. सत्तेची पदे घेतली. दक्षिणेतील माजी आमदारांनीही महाडिकांची मदत घेतली परंतु हीच मंडळी आता महाडिक कुटुंबाने सकारात्मक भूमिका घेऊन भाजपशी युती करताच यांच्या पोटात का दुखते? असा सवाल मोदी यांनी केला.
या सभेत आमदार सुरेश हाळवणकर, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, प्रदेश उपाध्यक्षा कांता नलवडे, सदाभाऊ खोत, उत्तम कांबळे यांचीही भाषणे झाली. खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरुप महाडिक, भगवान काटे, चंद्रकांत जाधव, माणिक पाटील-चुयेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.