जनतेच्या अपेक्षांचा भ्रमनिरास
By admin | Published: July 10, 2015 10:32 PM2015-07-10T22:32:53+5:302015-07-11T00:17:39+5:30
शरद पवार यांचा सरकारवर निशाणा : जनतेला नव्या शक्तीची गरज, जनसेवेचे कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन
मालवण : भाजप सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरु झाला आहे. विकासाचे प्रश्न बाजूला ठेऊन एक- एक घोटाळा उघड होत आहे. ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवणाऱ्या भाजपाने जनतेच्या अपेक्षांचा भ्रमनिराश केला आहे. जनतेला आता न्याय देण्यासाठी नवी शक्ती उभी राहणे गरजेचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी संघटना भक्कम करून जनतेला न्याय देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. सत्तेत नसलो तरी जनतेच्या सेवेचे कार्य सुरु ठेऊया, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी शुक्रवारी मालवण तारकर्ली येथे पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डांटस, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अबिद नाईक, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, अमित सामंत, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, शीला गिरकर, सावंतवाडीचे नगरसेवक राजू बेग, वेंगुर्लेचे कुमा गावडे, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाई कासवकर, दर्शना कासवकर यासह पदाधिकारी उपस्थित होते. अच्छे दिनाचा अर्थ कळू लागलाय केंद्रीय मंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविल्या. फळबाग योजना प्रथम महाराष्ट्रात राबवून यशस्वी केली. सिंधुदुर्गातील आंबा, काजू या फळशेतीला चांगल्याप्रकारे चालना मिळाली. यात शेतकऱ्यांची मेहनत महत्वाची आहे. केंद्र आणि राज्यात युतीचे सरकार अच्छे दिनाचे गोडवे गात आहे. निवडणूक काळात अच्छे दिन म्हणत जनतेच्या सरकारने अपेक्षा वाढविल्या. जनतेला आता विकासासाठी शक्ती हवी असते. शक्तीच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बळकट करूया, असे आवाहन पवार यांनी केले. आपण यापूर्वी ज्यांना संधी दिली. विधानसभेत पाठविले त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी दुसरा मार्ग स्वीकारला. आपण मात्र, त्या विषयावर जास्त बोलणार नाही. असे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता शरद पवार यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. (वार्ताहर) ‘पर्ससीन’ छोट्या मच्छिमारांना घातकच शरद पवार म्हणाले, किनारपट्टीवर पारंपरिक मच्छिमार व पर्ससीन ट्रॉलर्स यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. मच्छिमारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर निश्चित धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गचा विचार करता जिल्ह्याला सागरी किनारा लाभला आहे. सागरी क्षेत्रात रोजगार मिळविण्यासाठी नवीन धोरणे स्वीकारली पाहिजेत. पारंपरिक मच्छिमार आणि पर्ससीनधारक यांच्यात संघर्ष होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी विधानसभेत आमचे आमदार आवाज उठवतील. अन्याय होत असलेल्या माच्छिमारांना न्याय दिला जाईल, असे पवार म्हणाले. सीआरझेड हा देशातील कायदा नवीन बांधकामांना मर्यादा आणणारा असावा. मात्र, स्थानिक व पिढ्यानपिढ्या किनारपट्टीवर राहणाऱ्यांना या कायद्यात संरक्षण असावे. सीआरझेडप्रश्नी संसदेत आवाज उठवणार असल्याचे पवार म्हणाले. पारंपरिक मच्छिमारांकडून आभार पारंपरिक मच्छिमार संघटनेचे नेते रविकिरण तोरसकर, दिलीप घारे यांनी पवार यांचे आभार मानत राष्ट्रवादीच्या सत्ता कार्यकाळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्ससीन मासेमारीच्या नव्या परवान्यांना बंदी घातली. हा मोठा निर्णय पारंपरिक मच्छिमारांना दिलासादायक ठरला. यापुढेही पर्ससीन बंदी, सीआरझेड मध्ये मच्छिमारांना शिथिलता याबाबतही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशीही मागणी मच्छिमारांच्यावतीने करण्यात आली. रवीकिरण तोरस्कर यांनी छोट्याखानी भाषणात बोलताना केली. जिल्हा बँकेबाबत अभिनंदन नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत सहापैकी सहा संचालक निवडून आले. जिल्ह्यात अन्य छोट्या मोठ्या निवडणुकीतही राष्ट्रवादी चांगले यश मिळवत आहे. याबाबत विजयी उमेदवारांसह जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस तसेच राष्ट्रवादीच्या अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांचे पक्षाध्यक्ष पवार यांनी विशेष अभिनंदन केले. तसेच कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आवाहन केले.