डिस्कव्हरी मराठीसाठी नेटीझन्समध्ये उदासीनता
By admin | Published: May 12, 2015 02:20 AM2015-05-12T02:20:31+5:302015-05-12T02:20:31+5:30
नॅशनल जिओग्राफिक, अॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरीसारख्या चॅनेल्सवरील माहितीपूर्ण कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच.
मुंबई : नॅशनल जिओग्राफिक, अॅनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरीसारख्या चॅनेल्सवरील माहितीपूर्ण कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच. परंतु भाषा हा अडसर असल्याने अनेकांना याचा पूर्णपणे आस्वाद घेता येत नाही. महाराष्ट्रातही प्रादेशिक भाषांतल्या कार्यक्रमांच्या प्रेक्षकसंख्येत मराठी कार्यक्रमांची प्रेक्षकसंख्या निर्विवादपणे अग्रस्थानी आहे. त्यामुळे डिस्कव्हरीच्या मराठी व्हर्जनसाठी वाहिनीकडे आॅनलाईन निवेदन पाठविण्याचे कार्य काही वर्षांपासून सुरु आहे. मात्र मराठीचे गोडवे गाणाऱ्या मराठीजनांनी मात्र याकडे सपशेल पाठ फिरवली आहे.
भारतासारख्या बहुभाषिक देशात प्रादेशिक भाषांचे महत्त्व मोठे आहे. दाक्षिणात्य राज्य हे त्याचे उत्तम उदाहरण. म्हणूनच चॅनेल्सनी याचे महत्त्व ओळखून दाक्षिणात्य भाषांमध्ये डब केलेले कार्यक्रम दाखविण्यास सुरुवात केली. परंतु, डिस्कव्हरी वाहिनी मराठी भाषेत सुरु करण्यासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेला केवळ ३२ व्यक्तींनी प्रतिसाद दिला. मराठीबाबत अजूनही उदासिनता असल्याचेच यातून दिसून आले. एका बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रांती होत असताना दुसऱ्या बाजूला ‘वी वॉन्ट डिस्कव्हरी नेटवर्क इन मराठी’ हे फेसबुकवरील पेज दुर्लक्षित असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे २००३ सालापासून सुरु झालेली ही मोहीम थंड पडलेली आहे.
‘डिस्कव्हरी’ नेटवर्क मराठी भाषेत सुरु करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक ताकदीने याविषयी जनजागृती झाली पाहिजे. विद्यार्थ्यांचा या मोहिमेतील सहभाग वाढविला पाहिजे. जेणेकरुन, वाहिनीने लवकरात लवकर मराठी भाषेतील कार्यक्रमांसाठी हालचाल सुरु केली पाहिजे, असे साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)