शिंदे, पवारांसोबतचा भाजप आवडत नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खदखद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 05:02 AM2023-09-01T05:02:11+5:302023-09-01T09:26:23+5:30
मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आढावा बैठकीसाठी मुनगंटीवार शहरात आले होते.
छत्रपती संभाजीनगर : देशसेवा करणारा पक्ष म्हणून भाजप आवडतो. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचा भाजप मला आवडत नसल्याचे वक्तव्य करून सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनातील खदखदीला गुरुवारी वाट मोकळी केली. पत्रकारांनी पुन्हा तोच प्रश्न विचारल्यानंतर मात्र त्यांनी सारवासारव करत ट्विस्ट करू नका, असे सांगून शिंदे-पवार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे सोबत आल्याचे सांगितले.
मुनगंटीवार म्हणाले, माझा व गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांचा चेहरा पाहिल्यानंतर अस्वस्थता आहे म्हणून वाटतेय का ? शिंदे-पवारांमुळे पक्षात कुणीही अस्वस्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आढावा बैठकीसाठी मुनगंटीवार शहरात आले होते.
गृहमंत्र्यांना केले निमंत्रित...
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त १६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रित केले आहे. मी आणि मुख्यमंत्र्यांनी स्वत: निमंत्रण दिले आहे. अजून त्यांच्याकडून होकार आलेला नाही. ८ सप्टेंबरपर्यंत माहिती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.