बार्शी तालुक्यातील ५५ सोसायट्यांची संचालक मंडळं बरखास्त
By admin | Published: June 22, 2016 06:48 PM2016-06-22T18:48:15+5:302016-06-22T18:48:15+5:30
संचालक मंडळाने टाळाटाळ केल्याने ५५ सोसायट्यांचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे.
ऑनलाइन लोकमत
बार्शी, दि. 22 - तालुक्यातील ब आणि क वर्गातील ५५ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी मुदत संपून देखील निवडणूक घेण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास कळविले नाही. तसेच निवडणूक खर्चाचा निधी भरणा न केल्याने संचालक मंडळाची निवडणूक घेणेकामी संस्थेच्या संचालक मंडळाने टाळाटाळ केल्याने ५५ सोसायट्यांचे संचालक मंडळ बरखास्त करुन प्राधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. ही कारवाई बार्शीचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था उमेश पवार यांनी केली आहे़
याबाबत माहिती देताना उमेश पवार म्हणाले की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार नोंदल्या गेलेल्या सहकारी संस्थेने आपल्या उपविधीचे तसेच नियम व अधिनियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ आय (२) मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) २०१४ नियम ७५ (५) (अ) प्रमाणे संस्थेच्या मुदत संपण्यापूर्वी तिची निवडणूक घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला कळविणे समितीचे कर्तव्य आहे. मात्र बार्शी तालुक्यातील ब व क वर्गातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कब (१४) (अ) नुसार किमान ६ महिन्यांपूर्वी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास कळवणे आवश्यक होते. परंतु संस्थेने तसेच कळविलेले नाही व संस्थेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करुन घेतलेली नाही. तसेच १९६० व १९६१ चे नियमातील तरतुदीनुसार प्रक्रिया पूर्ण करुन संस्थेची मतदार यादी व निवडणूक निधी भरणा करुन त्याची पोहच या कार्यालयाला सादर करणे आवश्यक होते. त्यानुसार काही संस्थांनी मतदार यादी सादर केली परंतु निवडणूक निधीचा भरणा केलेला नाही.
संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करुन घेण्यासाठी निवडणूक निधी भरण्याबाबत गटसचिवांच्या मासिक व पाक्षिक बैठकीत वारंवार तोंडी सूचना देवून देखील संस्थेने निवडणूक निधीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे संस्थेच्या संचालक मंडळास जबाबदार धरुन संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करुन त्यांच्या ऐवजी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेतील शाखा निरीक्षकांची ६ महिन्यांसाठी सहा.निबंधक सहकारी उमेश पवार यांनी नेमणूक केली आहे.
या आहेत त्या ५५ सोसायट्या
दि. ३१ डिसेंबर २०१५ अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या ब वर्गातील विविध कार्य. सेवा सह. संस्था-कारी, माळेगांव नं. २, कासारी, सावरगांव, जवळगांव, कव्हे, इंदापूर, रुई गु्रप, शिराळे, घाणेगांव, सासुरे, सारोळे, शेळगांव (आर), कोरफळे, नांदणी, ढोराळे, आंबेगांव, देवगांव, हिंगणी, घारी नं. २. जानेवारी २०१६ ते जून २०१६ अखेर निवडणुकीस पात्र संस्था- धामणगांव दु., मुंगशी (वा.), श्रीपत पिंपरी, दहिटणे, तुर्कपिंपरी, उपळे दु. क वर्गातील डिसेंबर २०१६ अखेर निवडणुकीस पात्र संस्था- महागांव, शेलगांव, धानोरे, कापशी, वाणेवाडी, कळंबवाडी, बळेवाडी, मळेगांव नं. १, गाडेगांव, संगमनेर, मुंगशी, हळदुगे, ताडसौंदणे, भलगाव, मिर्झनपूर, आळजापूर, चारे, चिंचोली, जामगांव, रऊळगांव, काटेगांव, बोरगांव, कांदलगांव, पिंपरी आर, झाडी.
क वर्गातील जून २०१६ अखेर निवडणुकीस पात्र संस्था- पिंपळगांव (पा.), मानेगांव व कारीपेठ.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसदेखील विकास सोसायट्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतची पत्र दि. ५ एप्रिल १६ रोजी दिले होते व याची प्रत बार्शी व वैराग येथील वरिष्ठ शाखा निरीक्षक, जिल्हा देखरेख संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा उपनिबंधक, सोलापूर यांना देखील सहा. निबंधक कार्यालय, बार्शीच्यावतीने देण्यात आले होते.