नगरसेवकांचा मराठीत निवेदनास नकार
By admin | Published: February 13, 2015 01:42 AM2015-02-13T01:42:07+5:302015-02-13T01:42:07+5:30
धोकादायक इमारतींच्या गंभीर प्रश्नाला पालिका महासभेत आज राजकीय वळण मिळाले़ हिंदी भाषिक नगरसेवकाला मराठीतून निवेदन वाचण्यास नकार
मुंबई : धोकादायक इमारतींच्या गंभीर प्रश्नाला पालिका महासभेत आज राजकीय वळण मिळाले़ हिंदी भाषिक नगरसेवकाला मराठीतून निवेदन वाचण्यास नकार दिला़ मात्र सत्ताधाऱ्यांनी याचे भांडवल करीत मराठीचा आग्रह धरला़ त्यानंतर विरोधी पक्षांनी सभात्याग करीत मराठी द्वेष्टेपणाचे दर्शन घडविले़
समाजवादी पक्षाचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर पालिका महासभेत चर्चा घडवून आणण्यासाठी ६६ ब अंतर्गत निवेदन सादर केले. मात्र यातील हे संपूर्ण निवेदन आकडेवारीसह मराठीतून वाचण्याचा आग्रह शिवसेना-भाजपाने धरला़ निवेदन दिल्यानंतर पुन्हा मराठीतून बोलण्यास आझमी यांनी नकार दर्शविला़
यामुळे हिंंदी भाषिक विरुद्ध मराठी असा रंग आला़ हा वाद वाढत त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस नगरसेवकही सहभागी झाले़ विरोधी पक्षाने याविरोधात एकत्रित येऊन सभात्याग केला़ मराठीतून बोलण्याचा आग्रह का? आम्ही हिंदीतूनच बोलणार, असा सूर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर लावला. (प्रतिनिधी)