महासत्तेचे स्वप्न पेरणारे नेतृत्व हरपले
By admin | Published: July 29, 2015 02:14 AM2015-07-29T02:14:25+5:302015-07-29T02:14:25+5:30
भारत २०२०पर्यंत जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न पेरणारा महान वैज्ञानिक देशाने गमावला आहे. एक पे्ररणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, या शब्दांत माजी राष्ट्रपती
मुंबई : भारत २०२०पर्यंत जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न पेरणारा महान वैज्ञानिक देशाने गमावला आहे. एक पे्ररणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, या शब्दांत माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कलाम आणि ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा.सू. गवई यांना श्रद्धांजली वाहून विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
दोन्ही सभागृहांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप आणि एमआयएमचे इम्तियाज जलिल आणि अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री म्हणाले की, आज देश महासत्ता होण्याकडे वाटचाल करीत असताना डॉ. कलाम आपल्यातून निघून जावेत ही शोकांतिका आहे. आपल्या देशात युवक शक्तीची ताकद ओळखून त्याचा लाभ कशा रीतीने घेतला पाहिजे याची उत्तम जाणीव त्यांना होती. भारत हा तरुणाईने समृद्ध देश होणार हे ओळखून युवाशक्तीला मनुष्यबळात परावर्तित केल्यास देश जागतिक महासत्ता होऊ शकतो, असा त्यांचा विश्वास होता.
रिपब्लिकन पार्टीचे नेते, विधान परिषदेचे माजी सभापती आणि बिहार व केरळचे माजी राज्यपाल रा.सू. गवई यांना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांच्या निधनाने राज्याच्या समतावादी चळवळीचा प्रमुख आधारस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला असून, आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी झालेय.
वाचन पे्ररणा दिवस
डॉ. कलाम यांचे लेखन पे्ररणादायी होते आणि त्यांना वाचनाचा छंद होता. त्यांची स्मृती सदैव राहावी यासाठी राज्यातील शाळा-महाविद्यालयांमधून त्यांचा जयंती दिन (१५ आॅक्टोबर) हा ‘वाचन पे्ररणा दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.
स्मृतिदिन बालविज्ञान दिन
एपीजे अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन राज्य शासनाने ‘बालविज्ञान दिवस’ म्हणून घोषित करावा, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सोमवारी केली. कलाम आणि रा.सू. गवई यांच्या निधनाबद्दल विधान परिषदेत शोकप्रस्ताव मांडण्यात आला त्या वेळी सभापती बोलत होते.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, प्रा. जोगेंद्र कवाडे, कपिल पाटील, जनार्दन चांदूरकर यांची या वेळी कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करणारी भाषणे झाली.