आॅनलाइन पेपर तपासणीवर नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2017 04:35 AM2017-05-01T04:35:29+5:302017-05-01T04:35:29+5:30
मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालामध्ये पारदर्शकता यावी, म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालामध्ये पारदर्शकता यावी, म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत यंदाच्या परीक्षांपासून लागू केली. पण सर्व शाखांना सरसकट ही पद्धत लागू केल्यामुळे राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नाराजी व्यक्त केली आहे. ही पद्धत टप्प्याटप्प्याने राबविण्यात यावी, असे मत उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. दोनदा निविदा प्रक्रियेला वाढीव वेळ दिल्यानंतर शुक्रवारी अखेर एका कंपनीची निवड करण्यात आली. त्यानंतर आता ४ मेपासून उत्तरपत्रिका तपासणीची सुरुवात होणार आहे. या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिका या आॅनलाइन पद्धतीने तपासण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिल्याच वेळी २२ लाख उत्तरपत्रिका तपासण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुभवी प्राध्यापकांऐवजी अन्य प्राध्यापकांना आॅनलाइन तपासणी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे निकाल लवकर लागतील, अडथळे येणार नाहीत, असा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला होता. पण सर्व शाखांसाठी ही पद्धत लागू केल्याने तसेच विनाअनुभवी प्राध्यापकांना पेपर तपासणीची जबाबदारी दिल्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने वर्तविली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाला उच्च शिक्षण विभागातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्यांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)
पायाभूत सुविधा देण्याचे काम सुरू
प्रत्येक वेळी मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडत असल्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागते. त्यामुळे यावर उपाय म्हणून कुलगुरूंनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा पर्याय निवडला. या प्रक्रियेसाठी मॅनेजमेंट कौन्सिलच्या झालेल्या बैठकीत कंपनीची निश्चिती करण्यात आली. या कंपनीने काम सुरू केले आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात होणार आहे.