रिकाम्या झोपड्यांचे रूपांतर कचरापेटीत
By admin | Published: June 29, 2016 02:00 AM2016-06-29T02:00:59+5:302016-06-29T02:00:59+5:30
मालाड मालवणी परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील अनेक झोपड्यांचे रूपांतर जीवघेण्या कचरापेटीत होत आहे.
मुंबई : मालाड मालवणी परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील अनेक झोपड्यांचे रूपांतर जीवघेण्या कचरापेटीत होत आहे. परिसरात कचरा घेऊन जाण्यासाठी घंटागाड्याच येत नसल्यामुळे कचरा परिसरातील रिकाम्या झोपड्यांमध्ये टाकण्यात येत आहे. कचऱ्याने भरलेल्या या झोपड्या ढासळून किंवा त्यांना आग लागून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.
स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत विशेषत: कचरावेचकांनी सर्व प्रकारचा कचरा प्रत्येकाच्या घरी जाऊन जमा करणे अनिवार्य आहे. मात्र मालवणीत कचरावेचक ठरावीक प्रकारचा कचराच घेऊन जातात, असे तेथील रहिवाशांनी ‘लोकमत’ला सांगितले. रिकामी शहाळी, गोण्या, पुठ्ठे अशा वस्तू नेण्यास ते सरळ नकार देतात. त्यामुळे हा कचरा घराबाहेर तसाच जमा राहतो. जो रात्रीच्या वेळी जवळपास असलेल्या रिकाम्या झोपड्यांमध्ये फेकला जातो. परिणामी, या झोपड्यांना आता मोठमोठ्या कचरापेट्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या झोपड्या साध्या पत्र्याच्या असल्यामुळे कचऱ्याच्या वजनाने त्या कधीही ढासळून अपघात होऊ शकतो. तसेच या कचऱ्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. (प्रतिनिधी)
घंटागाडी गेली कुणीकडे?
कचरा जमा करण्यासाठी पहाटे ७ ते दुपारी १२दरम्यान घंटागाडी या परिसरात फिरणे गरजेचे आहे. मात्र मालवणीत अनेक ठिकाणी घंटागाडीचे दर्शनच होत नाही. कागदोपत्री मात्र या गाड्या नियमितपणे फिरत असल्याचे दाखवले जाते. नियमितपणे कचरा जमा केला जातो तर ठिकठिकाणच्या झोपड्या या कचरापेट्यांमध्ये का रूपांतरित झाल्या आहेत, हा प्रश्नच आहे.
‘कारवाई करू’
‘आम्ही या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,’ अशी माहिती पालिकेच्या पी उत्तरच्या घनकचरा विभागाचे सहायक अभियंता प्रकाश गायकर यांनी ‘लोकमत’ला दिली.