राज्यभरातील चोरीच्या ट्रकची धुळ्यात विल्हेवाट
By Admin | Published: May 14, 2016 03:08 AM2016-05-14T03:08:32+5:302016-05-14T03:08:32+5:30
राज्यभरातून चोरीला गेलेल्या ट्रकची धुळ्यामध्ये विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विल्हेवाट लावलेल्या ट्रकचे इंजीन व इतर पार्ट पुन्हा कुर्ला तसेच तळोजा परिसरात विकले जायचे.
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
राज्यभरातून चोरीला गेलेल्या ट्रकची धुळ्यामध्ये विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विल्हेवाट लावलेल्या ट्रकचे इंजीन व इतर पार्ट पुन्हा कुर्ला तसेच तळोजा परिसरात विकले जायचे. अनेक वर्षांपासून त्याठिकाणी हा प्रकार सुरू असतानाही स्थानिक पोलिसांची त्याकडे डोळेझाक सुरू होती.
ट्रक चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एपीएमसी पोलीस वाहनचोर टोळीच्या शोधात होते. यावेळी एका टोळीची माहिती तपास पथकाला मिळाली होती. ही टोळी चोरीच्या ट्रकची धुळ््यामध्ये विल्हेवाट लावत होती. यानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद रोमन यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक निरीक्षक धनंजय माने यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. मुंबई- आग्रा मार्गालगत मोहाडे पोलीस ठाणे हद्दीत राज्यभरातील चोरीच्या ट्रकची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू होता. त्यानुसार घटनास्थळी असे ५० हून अधिक ट्रक व शेकडो ट्रकचे सुटे भाग आढळून आले. जे ट्रक त्याठिकाणी उभे होते त्यांचे महत्त्वाचे पार्ट काढून घेण्यात आलेले होते. तसेच सदर ट्रकची ओळख पटू नये याकरिता त्यावर रंग मारल्याचेही निदर्शनास आल्याचे सहाय्यक निरीक्षक धनंजय माने यांनी सांगितले. त्यानुसार घटनास्थळावरून जुबेर अहमद ऊर्फ बाबा शेख (४९), रंजीत रामप्रसाद सोनी (२७) व मोहसीन खान (१९) यांना अटक करण्यात आलेली आहे. मोहसीनच्या वडिलांच्या नावे मार्गालगतच्या मोकळ्या जागेत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. याकरिता त्याठिकाणी सहा गाळे बांधण्यात आले होते. त्याठिकाणी चोरून आणलेले ट्रक विल्हेवाट लावण्यासाठी लपवले जायचे. या टोळीने अद्यापपर्यंत केवळ टाटा कंपनीचेच ट्रक चोरल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. हे ट्रक गुजरात, वापी मार्गे दलालामार्फत त्याठिकाणी आणले जायचे अशी कबुली अटकेत असलेल्या तिघांनी दिली आहे.