आराखड्याबाबत उदासीनता

By admin | Published: July 23, 2016 01:58 AM2016-07-23T01:58:51+5:302016-07-23T01:58:51+5:30

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेद्वारे तालुक्यातील प्रत्येक गावात पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

Disposition of the plan | आराखड्याबाबत उदासीनता

आराखड्याबाबत उदासीनता

Next


वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून ‘आमचा गाव आमचा विकास’ या योजनेद्वारे तालुक्यातील प्रत्येक गावात पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, ग्रामस्थांचा अपेक्षीत सहभाग नसल्याने सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचा उद्देश फारसा यशस्वी होताना दिसत नाही.
तालुक्यात १० पंचायत समिती गण असून, प्रत्येक गणासाठी एक प्रभारी अधिकारी, प्रवीण प्रशिक्षक यांना यशदामार्फत प्रशिक्षण दिले आहे. त्यांची जिल्हा परिषदेमार्फत कामासाठी निवड करण्यात आली. दि. ४ जुलैपासून कार्यक्रम सुरू केला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीन-चार दिवस कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
‘आमचा गाव आमचा विकास’ योजनेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन गटविकास अधिकारी नीलेश काळे यांनी केले आहे.
तालुक्यात १०४ ग्रामपंचायती असून, त्यांपैकी २१ ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक आराखडा तयार केला आहे. उर्वरित ग्रामपंचायतीत ही योजना पुढील काळात होणार आहे. याकरिता ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमात काही गावे वगळता बहुतांश गावांत ग्रामस्थांचा सहभाग अतिशय कमी होता. शासकीय अधिकारी या योजनेसाठी खूप मेहनत घेताना दिसत आहेत. परंतु त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन देणे ग्रामस्थांच्या हिताचे आहे. परंतु ते होताना दिसत नाही.
योजनेची माहिती कार्यशाळेद्वारे प्रथम सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील आदींना देण्यात आली. नंतर आराखडा करण्याचे काम सुरू करण्यात आले. ग्रामपंचायत स्वनिधी, १४ व्या वित्त आयोगाचा निधी यामधुन ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करुन तो ग्रामसभेत मंजुर करायचा आहे. महिला सभा, वॉर्डसभा, युवक व युवती सभा, मासिक सभा घेऊन यांची मते आजमावून आराखडा तयार करायचा आहे. ग्रामस्थांनी यात सहभागी होणे गरजेचे आहे. उर्वरित गावात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाल्यास परिपूर्ण विकास आराखडा करता येईल. (वार्ताहर)
>विविध उपक्रम : ग्रामस्थांशी चर्चा
आराखड्यात वित्त आयोगाचा २५ टक्के, मानवी निर्देशांक (शिक्षण,आरोग्य,उपजिविका) १० टक्के, महिला-बालकल्याण व अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारीनुसार खर्च करणे बंधनकारक आहे. योजनेत प्रभारी अधिकारी व प्रवीण प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत गावातून मशालफेरी काढण्यात येते. चर्चासत्रात ग्रामपंचायतीची बलस्थाने, कुमकुवत घटना, संधी, धोके यांचे विश्लेषण होते, सामाजिक नकाशा, २०११ जनगणना, ग्रामपंचायत निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांची पाहणी, शिवारफेरी,पेयजल, स्वच्छता आदीची माहिती घेऊन चर्चेद्वारे आराखडा तयार करण्यात येतो.

Web Title: Disposition of the plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.