कोर्टात पान खाल्ल्याने झालेली बडतर्फी अखेर २४ वर्षांनी रद्द!
By admin | Published: October 13, 2014 05:26 AM2014-10-13T05:26:16+5:302014-10-13T05:26:16+5:30
पान चघळत न्यायालयात आल्याबद्दल दंडाधिका-यांनी शिक्षा केली व त्याची माहिती स्वत:हून कळविली नाही
मुंबई : पान चघळत न्यायालयात आल्याबद्दल दंडाधिका-यांनी शिक्षा केली व त्याची माहिती स्वत:हून कळविली नाही या कारणावरून सेवेतून बडतर्फ केलेल्या अमरावती मध्यवर्ती कारागृहातील एका कारागृह रक्षकास अखेर २४ वर्षांनी न्याय मिळाला आहे. हा कारागृह रक्षक पूर्ण सेवा करून निवृत्त झाला असे मानून त्यास पेन्शनसह सर्व निवृत्तीलाभ द्यावेत,असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
आज वयाच्या सत्तरीला आलेल्या ज्ञानेश्वर विठुजी घुडे यांना कारागृह प्रशासनाने, २६ वर्षांच्या सेवेनंतर ८ सप्टेंबर १९९० रोजी बडतर्फ केले होते. त्याविरुद्ध न्यायालयीन लढा देता देता सप्टेंबर २००३ मध्ये त्यांचे निवृत्तीचे वयही उलटून गेले. त्यामुळे न्या. अशोक भंगाळे व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या नागपूर येथील खंडपीठाने त्यांची बडतर्फी बेकायदा ठरविली तरी त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश दिला नाही. त्याऐवजी घुडे पूर्ण सेवा बजावून नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत, असे मानून त्यांना निवृत्तीच्या तारखेपासून पेन्शनसह सर्व निवृत्तीलाभ द्यावेत, असा आदेश दिला गेला.
२६ वर्षांच्या सेवाकाळात घुडे यांच्यावर एकूण सात वेळा शिस्तभंगाची कारवाई झाली होती. त्यापैकी तीन वेळा त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखली गेली होती व एकदा तर त्यांच्यावर ड्युटीवर असताना दारुच्या नशेत असभ्य वर्तन केल्याबद्दल कारवाई केली गेली होती. हे लक्षात घेऊन न्यायालयाने मागचा पगार देण्याचा आदेशही दिला नाही.
घुडे २९ एप्रिल १९८८ रोजी रजेवर होते व खासगी कामासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात गेले होते. तेथे पान चघळत न्यायालयात आल्याबद्दल दंडाधिकाऱ्यांनी त्यांना ५० रुपये दंड ठोठावला. घुडे यांचे हे वर्तन गणवेशधारी दलातील शिस्तबद्ध कर्मचाऱ्यास शोभनीय नाही. शिवाय न्यायालयाने केलेल्या या शिक्षेची माहिती घुगे यांनी स्वत:हून कळविलीही नाही, असे कारण देत त्यांना बडतर्फ केले गेले होते. मात्र त्यांचे हे वर्तन योग्य नव्हते हे मान्य केले तरी त्यासाठी दिलेली बडतर्फीची शिक्षा खूपच कठोर आहे, असे म्हणत न्यायालयाने ती रद्द केली. (विशेष प्रतिनिधी)