चार नगरसेवकांवर अपात्रतेचे गंडांतर?
By admin | Published: March 14, 2016 02:25 AM2016-03-14T02:25:51+5:302016-03-14T02:25:51+5:30
बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चार नगरसेवकांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली राज्याच्या नगरविकास विभागाने सुरू केल्या आहेत
ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चार नगरसेवकांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली राज्याच्या नगरविकास विभागाने सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील तरतुदीनुसार एक महिन्यात पालिका प्रशासनाने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, अन्यथा शासनाकडून त्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पत्रच राज्य शासनाने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पाठविले आहे.
नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर, पालिकेच्या सभागृहात दोनतृतीयांश मतांनी अपात्रतेचा ठराव मंजूर करावा लागेल. पालिका सभागृहात असा ठराव मंजूर होणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी महिनाभरात कारवाई झाली नाहीतर ‘त्या’ नगरसेवकांवर राज्य शासनाकडून कारवाईची शक्यता आहे. तसे झाल्यास पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दोषी नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासह लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांची वर्तणूक नगरसेवकपदास शोभणारी नसल्याचा ठपका ठेवत सरकारने हे पाऊल उचलले असून यासंबंधी त्यांना नोटिसाही बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण, काँग्रेसचे विक्र ांत चव्हाण, राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांच्या नावांचा उल्लेख केला होता. पोलीस तपासात ही नावे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर, चौघेही काही काळ भूमिगत झाले होते. त्यांना अटक झाल्यानंतर काही अटीशर्तींवर त्यांची सव्वादोन महिन्यांच्या कालावधीनंतर जामिनावर मुक्तता झाली. आता राज्य शासनाने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातील या चार नगरसेवकांचे पद रद्द करण्याबाबतच्या हालचाली मंत्रालयात सुरू असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. (प्रतिनिधी)