खंडित वीजपुरवठा आता ‘नवप्रकाश’ योजनेतून
By admin | Published: November 17, 2016 02:13 AM2016-11-17T02:13:42+5:302016-11-17T02:13:42+5:30
महावितरणने वीजबिल थकबाकीमुळे खंडित केलेला वीजपुरवठा ‘नवप्रकाश’ योजनेंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेत तब्बल अडीच लाखांहून अधिक ग्राहकांनी योजनेनुसार बिल अदा केले.
बारामती : महावितरणने वीजबिल थकबाकीमुळे खंडित केलेला वीजपुरवठा ‘नवप्रकाश’ योजनेंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेत तब्बल अडीच लाखांहून अधिक ग्राहकांनी योजनेनुसार बिल अदा केले. आता त्यांना नव्याने वीज जोडणी घेण्यास संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महावितरणचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता नागनाथ ईरवाडकर यांनी दिली.
महावितरणने ३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने १ नोव्हेंबरपासून ‘नवप्रकाश’ योजना सुरू केली आहे. बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ६३ हजार ३१८ वीजग्राहकांकडे ८० कोटी १२ लाख ४५ हजार रुपयांची मूळ थकबाकी, १३ कोटी १६ लाख ७ हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी १ कोटी ६० लाख २५ हजार रुपयांची थकबाकी आहे.
सातारा मंडलात ३९ हजार ७१८ वीजग्राहकांकडे १२ कोटी ९६ लाख ८० हजार रुपयांची मूळ थकबाकी, १ कोटी ४२ लाख ६२ हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी २५ लाख ९४ हजार रुपयांची थकबाकी आहे. तर सोलापूर मंडलात १ लाख ४७ हजार ५६८ वीजग्राहकांकडे ७२ कोटी १७ लाख ९५ हजार रुपयांची मूळ थकबाकी, ११ कोटी ३५ लाख ४१ हजार रुपयांचे व्याज, तसेच विलंब शुल्कापोटी १ कोटी ४४ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे. बारामती परिमंडलांतर्गत बारामती, सातारा व सोलापूर या तिन्ही मंडलांत एकूण २ लाख ५० हजार ६०४ ग्राहकांकडे १६५ कोटी २७ लाख २० हजार रुपयांची मूळ थकबाकी, २५ कोटी ९४ लाख १० हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी ३ कोटी ३० लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी आहे.
‘नवप्रकाश’ योजनेत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये ५ टक्के सूट दिली जाईल.