विद्यापीठ परीक्षांमध्ये सायबर हल्ल्यांचा व्यत्यय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 06:15 AM2020-10-10T06:15:14+5:302020-10-10T06:15:25+5:30
मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर येथे विद्यार्थ्यांना अडचणी, अचानक सर्व्हर झाला क्रॅश
मुंबई/सोलापूर : आयडॉल आणि मुंबई विद्यापीठ विभागाच्या अंतिम वर्षाच्या आॅनलाइन परीक्षांसाठी नेमलेल्या खासगी कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याने परीक्षाच कोलमडल्या. आयडॉलच्या पुढील सर्व परीक्षा १८ आॅक्टोबरपर्यंत रद्द करण्याची नामुश्की विद्यापीठावर ओढवली आहे. सायबर हल्ल्यामुळे सर्व्हर क्रॅश झाल्याने पुणे, सोलापूर व अन्य विद्यापीठांच्या आॅनलाइन परीक्षांमध्येही व्यत्यय आला. सायबर सेलकडे तक्रार करण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या दुसऱ्या दिवशीदेखील घोळ कायम राहिला.
तांत्रिक अडचण आलेल्यांना पुन्हा संधी
अंतिम वर्षातील एखादा विद्यार्थी कोरोना
पॉझिटिव्ह आढळल्यास, तांत्रिक अडचण उद्भवल्यास अशा विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईल. एटीकेटीधारक, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा सहा महिन्यांच्या आत घेतली जाईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. वाढीव आणि जबरदस्तीने शुल्क आकारणीची तक्रार झाल्यास संबंधित शैक्षणिक संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.