अतिवृष्टीचे विघ्न! मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांत नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:42 AM2020-08-23T02:42:31+5:302020-08-23T07:36:00+5:30

जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण झाले असताना संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराने पुन्हा शेतकऱ्यांना फटका बसला आहे

Disruption of heavy rains! Damage in all districts except Latur and Osmanabad in Marathwada | अतिवृष्टीचे विघ्न! मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांत नुकसान

अतिवृष्टीचे विघ्न! मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद वगळता सर्व जिल्ह्यांत नुकसान

Next

निसर्गराजा मराठवाड्यावर यंदा पहिल्या दिवसापासून मेहेरबान आहे. सर्वच जिल्ह्यांत वेळेवर पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातून पाणी येण्याआधीच जायकवाडीत समाधानकारक पाणीसाठा झाला. मांजरा वगळता सर्वच प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा झाला. मात्र, या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. उस्मानाबाद आणि लातूर वगळता सर्वच जिल्ह्यांत या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अनेकांच्या शेतातील पाणी अजुनही हटलेले नाही. अद्याप पंचनामेच पूर्ण न झाल्याने मदतीच्या बाबतीत बोलायचीही सोय राहिली नाही.

औरंगाबाद जिल्ह्यात सर्वच पिके धोक्यात
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, सोयगाव, कन्नड, वैजापूर, फुलंब्री, गंगापूर या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील कापूस, मका या पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

वैजापूर तालुक्यात सततच्या पावसाने १२२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यात मका, कपाशी, बाजरी, मूग या पिकांचा समावेश आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती तहसीलदार निखिल धुळधर यांनी दिली. सोयगाव तालुक्यात ३२ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली असून सततच्या पावसामुळे ८ हजार हेक्टरवरील कपाशी पिकांना फटका बसला आहे. तालुक्यातील नुकसानीचा अहवाल कृषी विभागाकडून मागविण्यात आला आहे. आदेश आल्यानंतर पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.

कन्नड तालुक्यात काढणीला आलेल्या मुगाला कोंब फुटले असून कपाशी पिवळी पडली आहे. ३० जुलैपर्यंत १३ गावातील ७०.७६ हेक्टर क्षेत्रावरील पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली असून त्यांचे पंचनामे झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक यांनी दिली.
खुलताबाद तालुक्यात ३३ हजार ४४२ हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक कापूस, मका, बाजरी, तूर या पिकांचा समावेश आहे. पैठण तालुक्यात आतापर्यंत ६२२.५० मि. मी. पाऊस झाला आहे. सततच्या पावसाने पिके पिवळी पडू लागली आहेत. मात्र, तालुक्यात अतिवृष्टी झाली नसल्याने पंचनामे केले नसल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.

फुलंब्री तालुक्यात सततच्या पावसाने शेतात पाणी तुंबले असून पिके पिवळी पडून नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे वरिष्ठांच्या सुचनेनुसार पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली. गंगापूर तालुक्यात सततच्या पावसाने कपाशी, सोयाबीन, मका, तूर, मूग, भुईमूग, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी सर्वच मंडळातील बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या आहेत.

हिंगोलीत पूरस्थितीचा पिकांना पुन्हा फटका
जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे नुकतेच पूर्ण झाले असताना संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुराने पुन्हा शेतकºयांना फटका बसला आहे जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ४.२४ लाख हेक्टर असून ४.0६ हेक्टरवर पेरणी झाली. जून-जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे हिंगोली तालुक्यात २१ गावांत १३९५ हे. सोयाबीन, कळमनुरीत ३५ गावांत ४७८५ हेक्टर सोयाबीन, वसमत तालुक्यातील ११ गावांत ४७२ हेक्टर सोयाबीन तूर, औंढा तालुक्यातील ३१ गावांत २१0५ हेक्टर सोयाबीन, हळद, कापूस, मूग, उडीद, तुरीचे तर सेनगाव तालुक्यातील १३ गावांत १३१६ हेक्टरवरील सोयाबीन व तुरीचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाला सादर झालेला आहे.

उस्मानाबादेत किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी त्रस्त
जिल्ह्यातील मोजकीच मंडळे वगळता अद्याप कोठेही मोठा पाऊस झालेला नाही़ आॅगस्टच्या मध्यापर्यंत जिल्ह्यात १७ टक्के कमी पाऊस झाला आहे़ असे असले तरी पिकापुरता पाऊस होत गेल्याने वाढ चांगली झालेली आहे़ मात्र सध्या उडीद, मूग, सोयाबीन, मका यावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे़ यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत़ जून महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांतच जोरदार पाऊस झाला होता़ त्यामुळे ही सरासरी वाढली आहे़ यानंतरच्या केवळ पिकापुरता पाऊस होत गेला आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झालेला आहे़ एकूण ३ लाख ५८ हजार ६३२ हेक्टर्सवर सोयाबीन आहे़ खरीप ज्वारीची ७ हजार ३६० हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी झालेली आहे़ बाजरी ३ हजार ६२०, उडीद ४८ हजार ९१७, मूग २२ हजार ६७९ हेक्टर्स तर तूर ६९ हजार ३४३, मका ११ हजार ८५२ व कापसाची लागवड ८ हजार १ हेक्टर्स क्षेत्रावर करण्यात आलेली आहे़ अधूनमधून पडणाºया रिमझिम पावसामुळे सध्या पिकांवर मोठ्या प्रमाणात अळी व किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे़ यातील प्रामुख्याने सोयाबीन, मूग, उडीद, मका व कापूस ही पिके रोगाच्या कचाट्यात अडकली आहेत़

बीडमध्ये पिकांना धोका
जिल्ह्यातील खरीप हंगामात झालेल्या चांगल्या पावसामुळे सगळीच पिके जोमात आलेली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी मागील ८ दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे काही मंडळांत पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र ७ लाख ४६ हजार हेक्टर आहे. जूनपासून चांगल्या पावसामुळे सुमारे ७ लाख ४९ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.
दरम्यान, यामध्ये सर्वाधिक २ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला आहे. त्याखालोखाल कापूस, मुग, उडीद, तूर यासह इतर पिकांचा पेरा करण्यात आलेला आहे. १० आॅगस्टपासून सुरु झालेल्या संतधार पावसामुळे उडीद व मूग पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकºयांमधून वर्तवण्यात येत आहे. अतिवृष्टी झाल्याची नोंद अद्यापपर्यंत जिल्ह्यात कुठेही नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी ४६५.८ मि.मी. पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण ७२ टक्के आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस वाढल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लातूर जिल्ह्यात यंदा ठीकठाक पाऊस
अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत लातूरला पाऊस कमी असल्याने नुकसान टळले आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभापासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असून, ५४ टक्के बरसला आहे. त्यामुळे पेरण्या वेळेत झाल्या असून सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव वगळता यंदा खरीप जोरात आले आहे. जिल्ह्यात ४३०.८ मि.मी. पाऊस झाला आहे. हा पाऊस पिकांसाठी हानिकारक नसल्याने बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्याची सरासरी ७९१.६० मि.मी. असून, आतापर्यंत ४३०.८ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ५४ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यांत ६ लाख ४५ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र प्रस्तावित होते. त्यापैकी ६ लाख ३३ हजार ९६ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यात सोयाबीन ४ लाख ५९ हजार ३२६, तूर ८८ हजार ८३९, मूग ११ हजार ८४३, उडीद ९ हजार ४००, कापूस ८ हजार २७५, मका ४ हजार ५९७, बाजरी ५५६ तर ज्वारीचा पेरा १७ हजार ७७ हेक्टरवर झाला आहे.

परभणी जिल्ह्यात २४ हजार हेक्टरवरील मुगाचे नुकसान
जिल्ह्यात सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून, अतिवृष्टीमुळे जवळपास २४ हजार १८८ हेक्टर जमिनीवरील मुगाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत ५११.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १० दिवसांपासून सातत्याने सरी कोसळत आहेत. त्यामुळे २४ हजार १८८ हेक्टरवर पेरा केलेल्या मुगाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, परभणी, जिंतूर, पूर्णा, पालम इ. तालुक्यांमध्ये नुकसानीचे प्रमाण कायम आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला शेतकºयांचा घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. याशिवाय अतिवृष्टीचा कापूस, सोयाबीन इ. पिकांनाही फटका बसला आहे.

नांदेडला पंचनामे सुरूच नाहीत
जिल्ह्यात आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामातील मूग, उडीद ही डाळवर्गीय पिके हातची गेल्याची चिन्हे आहेत. त्याचवेळी कापूस, सोयाबीन, तूर या पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. असे असले तरीही प्रत्यक्षात जिल्ह्यात अतिवृष्टीचे पंचनामे अद्याप सुरूच झाले नाहीत. कोरोना हे या मागचे कारण सांगितले जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १०१.६४ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरिपाचे ७ लाख ४२ हजार ८६१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. जिल्ह्यात ७ लाख ५५ हजार १८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सर्वाधिक ११५.३९ टक्के पेरणी देगलूर तालुक्यात झाली आहे. जिल्ह्यात ३ लाख ८२ हजार १८४ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच १२२.९४ टक्के गळीत धान्याची पेरणी झाली आहे. कडधान्याचे १ लाख ६ हजार ४४८ हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात १ लाख २५ हजार ३११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तृणधान्याची ५५ हजार ४० हेक्टर क्षेत्रापैकी ३३ हजार ११३ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. कापसाचीही जिल्ह्यात २ लाख १४ हजार ४१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९ हजार ३७५ इतके असताना प्रत्यक्षात ३ लाख ८१ हजार ३७३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.
 

Web Title: Disruption of heavy rains! Damage in all districts except Latur and Osmanabad in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.