पोलीस बदल्यांच्या घोळामुळे अधिकाऱ्यांत नाराजी; डीजींच्या रजेची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 03:32 AM2020-10-05T03:32:10+5:302020-10-05T06:52:29+5:30
गृहविभागाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित असताना, महासंचालक स्तरावरील बदल्यांना अद्याप मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
- जमीर काझी
मुंबई : कोरोनामुळे रखडलेल्या राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा यंदाचा घोळ अजून संपलेला नाही. उलट दिवसेंदिवस त्याचा गुंता वाढत असल्याची स्थिती निर्माण आहे. गृहविभागाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रलंबित असताना, महासंचालक स्तरावरील बदल्यांना अद्याप मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
ऑक्टोबरचा पहिला आठवडा होत आला, तरी अद्याप १५ हून अधिक वरिष्ठ आयपीएस अधिकारी, अप्पर अधीक्षक आणि डीजी गॅझेट झालेला नाही. पहिली यादी जारी करण्यास दोन सप्टेंबर उजाडला. त्यानंतर, ३० सप्टेंबरला मध्यरात्री ४३ आयपीएस व १०७ उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. मात्र, अद्याप तितक्याच बदल्या बाकी आहेत. त्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढविली आहे. सलग चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुख्यालय स्तरावरील कनिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांबाबत राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांनी कोणतेच संकेत दिले नाहीत. त्यामुळे ज्या अधिकाºयांचा नक्षलग्रस्त भाग, नागपूर आणि साईड ब्रँचला कालावधी पूर्ण झाला आहे, ते बदलीसाठी अस्वस्थ झाले आहेत.
डीजींबाबत अफवांचे पेव
सुबोधकुमार जायसवाल हे ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान किरकोळ रजेवर जाणार आहेत. मात्र, राज्यकर्त्यांशी पटत नसल्याने ते दीर्घ रजेवर तर एक नोव्हेंबरपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर जाणार, अशा अफवा पोलीस वतुर्ळात वेगाने पसरत आहेत.
२०हून अधिक डीवायएसपींची मॅटमध्ये धाव
उपअधीक्षकांच्या १०५ बदल्यांपैकी अनेकांना कालावधी पूर्ण होण्यापूर्वी हलविण्यात आले आहे. त्यापैकी सुमारे २०हून अधिक अधिकाºयांनी त्याविरुद्ध ‘मॅट’मध्ये धाव घेतली आहे.