ओबीसी, मराठा आरक्षणावर महाराष्ट्रात असंतोष- पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 06:23 AM2021-10-20T06:23:15+5:302021-10-20T06:23:39+5:30
इंधनाचे दर कमी व्हायला हवेत
नवी दिल्ली : आरक्षण रद्द झाल्याने महाराष्ट्रातील ओबीसींमध्ये तीव्र नाराजी व असंतोष आहे. राज्यात मराठा समाजाला दिलेले आरक्षणही रद्द झाल्याने आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात असंतोष आहे. अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारलाही काही बदल करावे लागतील, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी येथे केले.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावलेल्या सचिवांच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे दिल्लीत आल्या होत्या. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील सहकार, राजकीय स्थिती तसेच इतर महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष वेधले. देशातील महागाई, पेट्रोल, डिझेलचे वाढते दर, यावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, यावर तोडगा काढण्याची गरज आहे. गरीब, सामान्य माणसांना चांगले दिवस यायला हवेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येयही ते आहे. त्यावर लवकर तोडगा निघेल, असा आपणास विश्वास आहे. राज्यामध्ये सहकार अडचणीत असून, दुष्काळामुळे कारखान्यांना प्रचंड फटका बसला आहे. इथेनॉलच्या किमतीसंबंधी निर्णय घ्यायला हवा, अशी भावना मुंडे यांनी व्यक्त केली.
आरक्षणाबाबत...
महाराष्ट्रात ओबीसींचे आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक होत असल्याने या मर्यादेहून अधिकचे आरक्षण रद्द होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सर्वच आरक्षण रद्द झाले. मराठा बांधवांना देण्यात आलेले आरक्षणही रद्द झाले आहे. यामुळे मराठा व ओबीसी समाजात असंतोष आहे. इतर राज्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतले आहेत, असे त्या म्हणाल्या.