वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष

By Admin | Published: August 4, 2016 02:16 AM2016-08-04T02:16:00+5:302016-08-04T02:16:00+5:30

महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारीही दिवसभर नेरूळ ते वाशी दरम्यान चक्का जाम झाला होता.

Dissatisfaction with the traffic jam | वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष

वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष

googlenewsNext


नवी मुंबई : महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. बुधवारीही दिवसभर नेरूळ ते वाशी दरम्यान चक्का जाम झाला होता. सानपाडा रेल्वे स्टेशन व अन्नपूर्णा चौक ते महामार्गादरम्यानही वाहतूक कोंडी झाली होती. जवळपास एक महिन्यापासून वाहतूकदार व नागरिक त्रस्त असताना सर्वच राजकीय
पक्षांनी या विषयावर मौन बाळगले आहे.
सायन - पनवेल महामार्गावरील खड्ड्यांनी नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शासनाने १२२० कोटी रूपये खर्च करून महामार्गाचे रूंदीकरण केले. परंतु वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी वाढलीच आहे. वाशी, सानपाडा, तुर्भे, जुईनगर, नेरूळ ते पनवेलपर्यंत महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. सकाळी व सायंकाळी वाहनांची संख्या वाढली की पूर्ण वाहतूकच ठप्प होत आहे. बुधवारी दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सानपाडावरून नेरूळला जाण्यासाठी एक तास वेळ लागत होता. बसने प्रवास करणाऱ्या अनेकांनी बसमधून उतरून जवळच्या रेल्वेस्टेशनपर्यंत पायी जाणे पसंत केले. तुर्भे गावामधील भाजपा कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत केली. महामार्गावरील कोंडीमुळे अनेकांनी सानपाडा भुयारी मार्गातून पामबीच रोडवर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु अंतर्गत रोडवरही वाहतूक कोंडी असल्याने रेल्वे स्टेशनसमोरही चक्काजाम झाला होता. सानपाडा पेट्रोलपंप ते एपीएमसीपर्यंतच्या रोडवरील वाहतूकही थांबली होती. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय
झाली.
महामार्गावर एक महिन्यापासून वाहतूक कोंडी होत आहे. वारंवार मागणी करूनही ठेकेदार खड्डे बुजवत नाही. रोज सकाळी कामावर जाताना व कामावरून येताना एक ते दोन तास वाहतूक कोंडीमध्ये जात आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचेही प्रचंड नुकसान होत आहे. रोज दोन ते तीन मोटारसायकल घसरून अपघात होत आहे. परंतु या समस्येकडे शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. शहरातील छोट्याशा समस्यांवरही आंदोलन करणारे राजकीय पक्ष वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर गप्प बसले आहेत. यापूर्वी शिवसेनेने महामार्गाच्या कामाविषयी जनहित याचिका दाखल केली होती. परंतु आता राज्यातील सत्तेमध्ये सहभागी असताना व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) खात्याची जबाबदारी आहे. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगले आहे.
भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी सुरू असल्याने व राज्यातील सत्ता असल्यामुळे तेही गप्प बसले आहेत. राष्ट्रवादी काँगे्रसची नवी मुंबईमध्ये सत्ता आहे. परंतु राज्यात विरोधी पक्षात असल्याचा विसर त्यांना पडला असल्याची टीका शहरवासी करत आहेत. काँगे्रसही या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.
।शिवसेनेला पडला महामार्गाचा विसर
सायन - पनवेल महामार्गाचे रूंदीकरण सुरू असताना सर्वाधिक आंदोलने शिवसेनेने केली होती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. परंतु गत दोन वर्षापासून अचानक शिवसेनेने या प्रश्नावर मौन बाळगले आहे. महामार्ग रूंदीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. एक वर्षामध्ये रोडवर खड्डे पडले आहेत. पादचारी व भुयारी मार्गांचे कामही थांबले आहे. एक महिन्यापासून नवी मुंबईमधील प्रवाशांसह महामार्गावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. रोज चक्का जाम होत असताना शिवसेना गप्प का, असा प्रश्नही आता शहरवासी विचारू लागले असून या समस्येवर अद्याप आंदोलन का नाही अशीही विचारणा होत आहे.

Web Title: Dissatisfaction with the traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.