ST Strike: कारवाईचा बडगा उगाराल तर असंतोषाचा भडका उडेल; राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 08:45 AM2021-11-05T08:45:52+5:302021-11-05T08:46:11+5:30
महामंडळाचे राज्य शासनातील विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकारकडून अद्याप ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. अन्यथा, कर्मचारी, कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.
महामंडळाचे राज्य शासनातील विलीनीकरणाच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर सरकारकडून अद्याप ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. अशात आंदोलनकारी आणि संपातील कामगारांवर कारवाईची भूमिका सरकारने घेतली आहे. दबावतंत्राचा वापर करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्यात येत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात केला आहे.
सर्वोत्तम सेवा
n एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना मनसेचा पाठिंबा जाहीर करतानाच राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याची गरज राज ठाकरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. काेरोनाकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम सेवा दिली.
n विलंबाने मिळणारे वेतन, त्यामुळे होत असलेल्या आत्महत्या, महामंडळाचा गैरकारभार यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांत असंतोषाचा भडका उडाला आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. एसटी कर्मचारी, कामगार जगला तरच एसटी जगेल, हे भान बाळगण्याची गरज आहे.