मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांचा माहापूर, आणखी एक आमदार अधिवेशन सोडून मतदारसंघात परतणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 22:59 IST2024-12-16T22:58:44+5:302024-12-16T22:59:35+5:30
Maharashtra Government Cabinet Expansion: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. त्यामध्ये तिन्ही पक्षातील मिळून ३९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र या शपथविधीनंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांचा माहापूर, आणखी एक आमदार अधिवेशन सोडून मतदारसंघात परतणार
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार रविवारी झाला. त्यामध्ये तिन्ही पक्षातील मिळून ३९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र या शपथविधीनंतर महायुतीमधील तिन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. तसेच मंत्रिपदाची संधी न मिळालेल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशन अर्ध्यावरच सोडून माघारी परतण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता आणखी काही आमदारांनीही परतीची वाट धरण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही अधिवेशनात उपस्थित राहण्याऐवजी मतदारसंघात माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडावेळी अजित पवार यांना साथ देणारे आमदार प्रकाश सोळंके हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी हिवाळी अधिवेशनाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ते अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघात परतणार आहेत. अजित पवार गटाकडून मंत्रिपद मिळालेल्या धनंजय मुंडे यांच्याऐवजी आपल्याला मंत्रिपद मिळायला हवं होतं, असा प्रकाश सोळंके यांचा दावा होता.
दरम्यान, अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेसुद्धा मंत्रिपद न मिळाल्याने अधिवेशन अर्ध्यावर सोडून मघारी परतले आहेत. तर शिंदेच्या शिवसेनेतील तानाजी सावंत यांनीही मंत्रिपद न मिळाल्याने नागपुरातून माघारी फिरणं पसंद केलं आहे. आमदार विजय शिवतारे आणि नरेंद्र भोंडेकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणातील पुढचे काही दिवस या नाराजी नाट्यांमुळे गाजण्याची शक्यता आहे.